भंडारा : जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अवैध रेती उपसा होत असलेल्या ठिकाणी मध्यरात्री पवनी पोलिसांनी छापा टाकून सहा ट्रॅक्टरसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, रेती उपसा करणाऱ्या या पाचही ट्रॅक्टरचे चालक घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
माहिती देताना सहायक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुका हा वाळू माफियांसाठी सर्वात मोठा अड्डा आहे. या तालुक्यातील विविध घाटांवर या अगोदर पोलीस आणि पवनी तहसीलदार यांच्या टीमने छापा टाकून कारवाया केल्या आहेत. मात्र, तरीही अवैध रेती उपसा हा काही केल्या बंद होताना दिसत नाही. शनिवारी, 12 सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील गुडगाव रेती घाटातून अवैध रेती उपसा होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. पण पोलिसांना पाहून तेथील चारही ट्रॅक्टर चालक घाटात ट्रॅक्टर सोडून पसार झाले. यावेळी गुडगाव रेती घाटातून रेतींनी भरलेले 3 व एक खाली ट्रॅक्टर पकडण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पूर्ण करून परत येत असताना कोदूर्ली येथील स्मशानभूमीत दोन ट्रॅक्टर असल्याचे त्यांना समजले. तिथे चौकशी केली असता अवैध रेती भरलेले दोन ट्रॅक्टर आढळून आले. मात्र, येथेही ट्रॅक्टरचालक आढळून आले नाही. या कार्यवाहीत विनानंबरच्या सहा ट्रॅक्टरसह पाच ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. या मुद्देमालाची अंदाजे किंमत पंचवीस लाख दहा हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा -कोरोनाच्या 6 मृतांपैकी 4 जणांनाच अग्नी, प्रशासनाकडे मृतांची माहिती नसल्याने गोंधळ