भंडारा-साकोलीवरून लाखांदूरला जात असलेल्या काळी-पिवळी प्रवासी गाडीचे टायर फुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन चुलबंदब नदीत कोसळली. या अपघातात दोन सख्ख्या बहिणीसह 6 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले आहेत. यापैकी 3 जण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारसाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चार जखमींना साकोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भंडारा:प्रवासी वाहन पुलावरून कोसळून पाच विद्यार्थीनींसह एका महिलेचा मृत्यू - student
2019-06-18 16:28:59
साकोली वरून लाखांदूरला जात असताना घडला अपघात
मंगळवारी 18 जूनला साकोली तालुक्यातील कुंभली गावाजवळील पुलावरून काळी पिवळी प्रवासी गाडी खाली पडून हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये शीतल सुरेश राऊत (वय 12) आणि तिची मोठी बहीण अश्विनी सुरेश राऊत (वय 22) ( दोघीही रा. सानगडी) या सख्ख्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. तसेच सासरा गावातील शीतल श्रीरंग कावळे (वय 20), सौ. शारदा गजानन गोटेफोडे (वय 45), सासरा टोली येथील सुरेखा देवाजी कुंभरे (वय 20) आणि गोंदिया जिल्ह्यातील गुणगुण हितेश पालांदुरकर(वय 15) यांचा मृत्यू झाला आहे.
तसेच 3 जण गंभीर जखमी झाले असून यामध्ये सौ. वंदना अभिमान मेश्राम (50 वर्ष, रा. सासरा), डिंपल कावळे (18 वर्ष, रा. तई) यांचा समावेश आहे. यांना उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सौ. विना हितेशराव पालांदुरकर (30 वर्ष, रा. गोंदिया), सिद्धी हितेशराव पालांदुरकर (5 वर्ष, रा. गोंदिया), मालन तुळशीराम टेंभुने (65 वर्ष, रा. खोलमारा), अभिमान तातोबा मेश्राम ( 45 वर्ष, रा. सासरा) यांना साकोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, दिघोरी येथील हटवार यांच्या मालकीची ही गाडी (एमएच 31 एपी 8241) ते स्वतः चालवीत होते. गाडी पुलावर आल्यानंतर गाडी काही तांत्रिक कारणाने अनियंत्रित होऊ लागली. गाडीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. त्यामुळे गाडी आता पुलावर खाली कोसळणार हे लक्षात येताच चालकाने गाडीतून उडी घेतली आणि तो पसार झाला. यानंतर गाडी जवळपास 80 फूट खाली कोसळली. या नदीचे पात्र कोरडे आहे. मात्र, पुलाच्या खांबाजावळ काही प्रमाणात पाणी साचले आहे. नेमक्या त्याच पाण्यात हो गाडी कोसळली. गाडीतील सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस चालकाचा शोध घेत आहे, तो मिळून आल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.