भंडारा- सनफ्लॅग आयर्न आणि स्टील कंपनीच्या व्यवस्थापकांच्या आडमुठ्या धोरणामुळे कामगारांनी कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले असून या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांविषयी कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाशी चर्चा करण्यासाठी रविवारी खासदार सुनील मेंढे यांनी या आंदोलन स्थळाला भेट दिली. कारखान्याच्या भरोशावर अनेकांची कुटुंबे चालतात. त्यामुळे तो बंद पडू नये याची काळजी तर आहेच, मात्र ज्यांनी घाम गाळून हा कारखाना उभा केला, अशा कामगारांच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम कारखान्याचे व्यवस्थापन करीत असेल तर हे कदापिही सहन केले जाणार नाही. कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी मी खंबीरपणे पाठीशी उभा राहून लढणार आहे. शांतता, संयम आणि एकजुटीच्या माध्यमातून आपण व्यवस्थापनाकडून आपले अधिकार खेचून आणू, अशा शब्दात खासदार सुनिल मेंढे यांनी मी तुमच्या सदैवसोबत असल्याचे सांगत कामगारांना दिलासा दिला.
कामगारांच्या अधिकारांसाठी पाठीशी राहून लढणारा - खासदार सुनिल मेंढे - भंडारा सनफ्लॅग आयर्न आणि स्टील कंपनी
वरठी येथील सनफ्लॅग स्टील कंपनीत स्थायी आणि अस्थायी स्वरूपाच्या कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. 13 मार्चपासून या संपाला सुरुवात झाली. जवळपास अडीच हजाराहुन अधिक कामगार या संपात सहभागी झाल्याने कारखान्याचे कामकाज ठप्प झाले आहे.
वरठी येथील सनफ्लॅग स्टील कंपनीत स्थायी आणि अस्थायी स्वरूपाच्या कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. 13 मार्चपासून या संपाला सुरुवात झाली. जवळपास अडीच हजाराहुन अधिक कामगार या संपात सहभागी झाल्याने कारखान्याचे कामकाज ठप्प झाले आहे. कंपनीसोबत संपलेला दर तीन वर्षांनी होणारा करार संपुष्टात आल्याने तो करण्यात यावा, कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन देण्यात यावे आणि अन्य अनेक मागण्यांना घेऊन हे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनामुळे कंपनीचे उत्पादन दुसऱ्या दिवशी ही पूर्णपणे ठप्प राहिले, त्यामुळे कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
रविवारी खासदार सुनील मेंढे यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला
रविवार आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी खासदार सुनिल मेंढे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलक कामगारांची भेट घेतली. आंदोलनकांच्या सर्व मागण्या ऐकून घेण्यात आल्या. त्यानंतर कामगारांना संबोधित करताना खासदार मेंढे म्हणाले, एक वर्षापासून कारखाना व्यवस्थापनाशी मागण्यांच्या दृष्टीने वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, व्यवस्थापन कामगारांचे हित समजून निर्णय देत नाही, ही बाब अत्यंत खेदाची आहे. कारखाना चालावा कारण त्यावर हजारो कुटुंबांचे पोट अवलंबून आहे. पण याचा अर्थ ज्यांनी कारखाना मोठा केला त्यांना त्यांचे अधिकार द्यायचेत नाहीत, असा होत नाही. कारखाना सुदृढपणे चालावा म्हणून मी नेहमीच व्यवस्थापनाच्या बाजूने बोलत आलो, पण माझ्या कामगारांच्या अधिकारांवर गदा येत असेल तर मी खंबीरपणे शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी उभा आहे, असेही खासदार सुनिल मेंढे यांनी यावेळी सांगितले. कंत्राटी कामगारांच्या मागण्या कागदावर पूर्ण करूनही प्रत्यक्षात त्याचे फायदे दिले जात नसतील तर ही कामगारांची पिळवणूक आहे. किमान वेतनाचा कायदा आहे. अशावेळी कोट्यवधी रुपयांचा नफा कमविणाऱ्या कंपनीकडून तोही दिला जाऊ नये, हा गुन्हाच म्हणावा लागेल. कारखाना व्यवस्थापन आमचे अधिकार देत नसेल तर ते संयम, शांतता आणि एकजूट दाखवून मिळवण्याची वेळ आली आहे आणि या संपूर्ण लढाईत मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे, असा शब्द खासदारांनी यावेळी कामगारांना दिला. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात हक्क मिळेपर्यंत सुरू ठेवा असेही त्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींचा अपमान सहन करणार नाही
शनिवारी कामगारांच्या मागण्यांना घेऊन मध्यस्ती करण्याच्या दृष्टीने गेलेल्या आमदार राजू कारेमोरे यांना कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. लोकप्रतिनिधी कुठल्या राजकीय पक्षाचा आहे हे महत्त्वाचे नाही. त्याचा अपमान केला जात असेल तर हे आम्ही सहन करणार नाही, अशा शब्दात खासदार मेंढे यांनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांच्या या कृतीचा निषेध केला. अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी सौजन्याने वागायला शिकले पाहिजे असेही ते म्हणाले. खासदार यांनी सुध्दा काही कामगार नेत्यांना घेऊन कंपनी व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली. मात्र, अद्याप तरी कोणताही मार्ग निघाला नाही त्यामुळे संप सुरू असून मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेतल्या जाणार नसल्याचे कामगार नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
इतर कंपन्यातील कामगार संघटनेचे नेते उपस्थित
आपल्या मागण्यांना घेऊन दुसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलनाच्या निर्णयावर ठाम असलेल्या सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीतील मजुरांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील अशोक लेलँड आणि ऑर्डनन्स फॅक्टरीच्या कामगार संघटनेच्या नेत्यांनी मंडपाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी व्यासपीठावर अॅड. मिलिंद देशपांडे, कामगार नेते उजवणे, सनफ्लॅग मजदूर सभा आणि कंत्राटी कामगार संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.