भंडारा -जिल्ह्यातील मानस साखर कारखान्याने यावर्षीच्या हंगामातील शेतकऱ्यांचे उसाचे पैसे दिले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोना काळात साखर विकली गेली नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे देण्यास विलंब होत आहे. मात्र हे पैसे देणे सुरू असून लवकरच सर्वांचे पैसे दिले जातील, असे कारखान्याचे शाखा व्यवस्थापक विजय राऊत यांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्यात एकमात्र साखर कारखाना मानस हा तुमसर तालुक्यातील देव्हाडा येथे असून भंडारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी या ठिकाणी ऊस आणत असतात. दरवर्षी ऊस गाळप हंगाम सुरु होताच ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस मानस कारखान्यात आणत असतात व या शेतकऱ्यांना उसाचे तात्काळ पैसे दिले जातील, अशी ग्वाही कारखान्याकडून दिली जाते. मात्र दरवर्षी शेतकऱ्यांचे पैसे उशिरा मिळतात, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. यावर्षी तर आठ महिन्यांचा कालावधी लोटून गेला असला तरी शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळालेले नाही. शेतकऱ्यांनी वारंवार कारखान्याकडे पैशाची मागणी केली तर लवकर तुमचे पैसे दिले जातील असं आश्वासन कारखान्याकडून दिले जाते. त्यामुळे कारखान्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे दिले नसल्याने आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
कोरोनामुळे साखर कारखान्यात पडून.. आठ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे उसाचे मिळाले नाहीत पैसे - भंडारा साखर कारखाना बातमी
जिल्ह्यातील मानस साखर कारखान्याकडून ऊस गाळप सुरू होताच शेतकऱ्यांना ऊसाचे बिल दिले जाते, मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे कारखान्याने गाळप केलेली साखर विकली गेली नसल्याने शेतकऱ्यांना पैसे देता आलेले नाहीत. मात्र लवकरच शेतकऱ्यांची बिले काढली जातील असे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले आहे.
हा साखर कारखाना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मालकीचा असल्याने शेतकऱ्यांनी नितीन गडकरी यांना विनंती केली आहे, की त्यांनी शक्य तेवढ्या लवकर शेतकऱ्यांचे पैसे द्यावे. शेतकरी आपला ऊस मानस कारखान्यात देत असतात त्याचे वेळोवेळी पैसे दिले जातात. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रभावामुळे साखर विकली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे देऊ शकलो नाही. आता शेतकऱ्यांचे १५ कोटींचे रुपये देणे सुरू असून उर्वरित दोन कोटी रुपये पुढील महिन्यात शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आधीच कोरोनाच्या संकटात हाताला काम नाही शेतकरी कसाबसा शेतीत राबून आपला उदरनिर्वाह करीत असताना आठ महिने लोटूनही शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
या कोरोनामुळे कारखान्याची साखर विकली गेली नसल्याने कारखानदार अडचणीत सापडला आहे तर शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने बिचारा शेतकरीही संकटात सापडला आहे.