भंडारा- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात संचार बंदी सुरू असल्याने लोकांनी स्वतःला घरी डांबून ठेवले आहे. मात्र, धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात 31 तारखेला घराबाहेर निघाले होते. शासकीय धान्य खरेदी केंद्रावर खरीप हंगामाचा धान्य खरेदी करण्याचा 31 मार्च शेवटचा दिवस असल्याने मोठी गर्दी पाहायला मिळाली. यामुळे संचारबंदीचे तीनतेरा वाजले होते.
पवनी तालुक्यतीलआसगाव येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरमध्ये धान विक्रीसाठी आणले होते. एकाच वेळेस जवळपास 100 ट्रॅक्टर इथे आल्याने या केंद्राच्या आत आणि बाहेर केवळ ट्रॅक्टर दिसत होते. एवढेच नाही तर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला या ट्रॅक्टर च्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना दुचाकी किंवा पायी जाणे ही कठीण झाले होते. संचारबंदीच्या काळात शेकडो लोक एकत्रित आल्याने संचारबंदीचा अक्षरशः फज्जा उडाला होता.