भंडारा- माजी सैनिकांचा आणि त्यांच्या परिवाराचा काल (शनिवारी) भंडारा येथे सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांच्यातर्फे हा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सैनिकांसाठी सभागृह बांधण्यासाठी २० लाख रूपये देण्याची घोषणा पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केली.
जिल्ह्याच्या मुख्यालयी माजी सैनिकांच्या सभागृहासाठी २० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जागा निश्चित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरु होणाऱ्या बीपीसीएल प्रकल्पात विरपत्नीसाठी १० टक्के जागा उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच माजी सैनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत शासनस्तरावर निश्चित प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
विजयश्री चॅरिटेबल ट्रस्ट व एक्स सर्व्हिसमेन वारिअर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित माजी सैनिकांच्या मेळावा साखरकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनिल मेंढे होते. आ. चरण वाघमारे, बाळा काशिवार, अॅड. रामचंद्र अवसरे, पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मुकेश साकूरे, गिऱ्हेपुंजे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, की देशातील सर्व समस्यांच्या ठिकाणी निवारणासाठी सैनिक अग्रेसर असतात. ९ ऑगस्ट क्रांती दिन व १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन यामध्ये माजी सैनिकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करुन सुवर्णमध्य साधला. त्यामुळे माजी सैनिकांच्या समस्या व प्रश्नांना सोडविण्यास मदत होणार आहे. विधान सभेच्या सदस्यांच्या मागणीनुसार माजी सैनिकांसाठी १ कोटी रुपये अनुदान सरकारतर्फे मंजूर करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.