भंडारा -तुमसर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे त्यांनी नव्याने स्थापन केलेल्या विकास आघाडी फाउंडेशनतर्फे मोहाडी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचा आयोजन केले होते. सत्तेत येण्यासाठी जी आश्वासने सध्याच्या सत्ताधारी लोकांनी दिली होती, त्याची पूर्तता लवकरात लवकर करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली.
हेही वाचा - 'सावरकरांवर खरंच प्रेम असेल तर गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा'
महाविकासआघाडी सरकारमधील समाविष्ट पक्षांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याची अजूनपर्यंत पूर्तता झाली नाही त्यांनी दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करावी, अशी प्रमुख मागणी या आंदोलनकर्त्यांची होती. पीक विम्याची रक्कम शासन निर्णयाप्रमाणे दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. विलंब झाल्यास विम्याच्या रकमेसह व्याज देण्याचे बंधनकारक असूनही मागील पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने व्याजासहित ही रक्कम अदा करावी. सरकारमध्ये समाविष्ट लोकप्रतिनिधीही अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.