महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदारकीसाठी बंडखोरी; भाजप नेत्यांनी माजी आमदार चरण वाघमारेंसह सहकाऱ्यांचे निलंबन केले रद्द - आमदार चरण वाघमारेंसह सहकाऱ्यांचे निलंबन रद्द

भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवणारे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह त्यांच्या सोबत गेलेल्या भाजपच्या काही लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना पक्षाने निलंबित केले होते. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे निलंबन रद्द केल्याने वाघमारेंसह त्यांचे सहकारी पुन्हा भाजपत परतले आहेत.

bhandara
माजी आमदार चरण वाघमारे

By

Published : Jul 10, 2020, 5:02 PM IST

भंडारा- विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करुन भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवणारे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह त्यांच्या सोबत गेलेल्या भाजपच्या काही लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना पक्षाने निलंबीत केले होते. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे निलंबन रद्द केल्याने वाघमारेंसह त्यांचे सहकारी पुन्हा भाजपत परतले आहेत. पक्षाचे व्यापक हित लक्षात घेऊन त्यांचे निलंबन रद्द केल्याचे पत्रात म्हटले आहे. या निलंबनामुळे भंडारा भाजपच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. चरण वाघमारे यांचे निलंबन रद्द झाल्याने पक्षातील विरोधी गटात नाराजी पसरली आहे.

काय होते बंडखोरी प्रकरण

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान तुमसर विधानसभा मतदार संघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पडोळे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी विद्यमान आमदार चरण वाघमारे यांचे तिकीट कापल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. यात भाजप उमेदवाराचा दारुण पराभव होऊन राष्ट्रवादी विजयी झाली होती. तर चरण वाघमारे हे केवळ 5 हजार मतांनी हारले होते. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केल्याने निवडणुकीनंतर माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह काही जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी घेतले निलंबन मागे

वाघमारे यांच्या निलंबनानंतर ते भाजपत परत येण्याच्या चर्चा जोरात सुरु होत्या. मात्र त्यांच्या विरोधी गटातील नेते हे पक्षात त्यांच्या पेक्षा जास्त प्रभावी होते. त्यामुळे त्यांनी पक्षात परत येण्यापेक्षा एक सामाजिक पक्षाची स्थापना करून लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या या ग्रुपच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद, आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत लढवल्या जाणार असल्याची चर्चा होती. असे झाल्यास त्याचा फटका भाजपला बसेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा मिळेल. ही बाब भाजप वरिष्ठांच्या कानावर गेल्यानेच वाघमारे आणि त्यांच्या साथीदारांचे निलंबन मागे घेतल्या गेल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

पक्षाच्या व्यापक हिताचा विचार करता, निलंबन मागे घेण्यात येत असल्याचे पत्रात नमूद आहे. याचा अर्थ चरण वाघमारे यांना येणाऱ्या काळात पक्षातील मोठी जबाबदारी सुद्धा दिली जाऊ शकते. जर असे झाले तर वाघमारे यांच्या विरोधी गटासाठी हा मोठा धक्का असेल. त्यामुळे येणाऱ्या काळात 2019 प्रमाणेच भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा पाहायला मिळू शकतात. चरण वाघमारे हे भाजपमध्ये परत आल्याने भाजपला खरंच फायदा होईल की नुकसान याची गोळा बेरीज राजकीय वर्तुळात लावली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details