भंडारा - कोरोना काळात नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. या आर्थिक नुकसानीचा फटका आता महावितरण कंपनीला बसला आहे. भंडारा जिल्ह्यातील 1लाख 68 हजार वीज ग्राहकांनी महावितरण कंपनीच्या बिलाचे 271 कोटी रूपये थकित ठेवत महावितरणालाच शॉक दिला आहे. त्यामुळे आता महावितरण कंपनी ग्राहकांना वीज बिल भरण्याची विनंती करत आहे.
महावितरणने ग्राहकांना थकलेले वीजबील भरण्याची विनंती केली आहे सर्वच ग्राहकांचा थकबाकीमध्ये समावेश -
भंडारा जिल्हा मंडळांतर्गत २ लाख ८८ हजार वीज ग्राहक आहेत. यापैकी एक लाख 64 हजार ग्राहकांची वीज बिले अजूनही थकीत आहेत. यामध्ये कृषी, घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक अशा सर्व प्रकारचे ग्राहक आहेत. या थकबाकीदार ग्राहकांनी महावितरण कंपनीला 271 कोटींचा धक्का दिला आहे. या पैकी कृषी ग्राहकांचे 216 कोटी थकलेले आहेत.
शंकांचे निराकरण करण्यासाठी घेतले मेळावे -
कोरोना काळात वीज ग्राहकांना महावितरणातर्फे सरासरी बिले पाठवली गेली. या बिलांवर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आले. या बिलांविषयी ग्राहकांना संपूर्ण माहिती मिळावी यासाठी मंडळातर्फे वेबिनार सुद्धा घेण्यात आले. तसेच ग्राहकांच्या तक्रारी, त्यांच्या अडचणी, चुकलेले बिल किंवा रिडींगमध्ये असलेली तफावत हे सर्व दुरुस्त करण्यासाठी भंडारा मंडळांतर्गत विभागीय, उपविभागीय आणि परिमंडळ पातळीवर मेळावे घेण्यात आले. जेणेकरून वीजबिलांसंबंधी असलेल्या शंकांचे निराकरण व्हावे.
नागरिकांनी वीज बिल भरावे, महावितरणाच्या अधिकाऱ्यांची विनंती -
मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. यात अनेक लोकांचे उद्योग, रोजगार बुडाले. हाताशी काम नसल्याने बऱ्याच ग्राहकांनी वीज बिले भरली नाहीत. वीज वितरण कंपनीने वाढीव बिले दिल्याने त्यात काही सूट मिळणार, या आशेनेही लोकांनी वीज बिले भरली नाहीत. त्यामुळे थकित वीज बिलाचा डोंगर वाढत गेला असून तो 271 कोटीवर गेल्याने भंडारा महावितरण विभागाची डोके दुखी वाढली आहे. ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करत वीज देयक भरावे, अशी विनंती भंडारा महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनी केली आहे.