बुलडाणा:- कोरोनाच्या प्रादुर्भाव थांबविण्यासाठी संपूर्ण भारत देश लॉकडाऊन केलेला आहे. यादरम्यान दारू मिळत नसल्याने तळीमारांच्या संयमाचा अंत संपला असल्याचे लक्षात येत आहे. बुलडाण्याच्या रायपूर येथील फुलोरा या वाईनबारला चोरांनी फोडून आतच दारू ढोसली व 16 हजार 300 रुपयांच्या दारूच्या बाटल्याही चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी त्यांनी वाईनबार मध्येच दारूच्या बाटल्या ही फोडल्या.
तळीरामांच्या संयमाचा अंत, बार फोडून दारु ढोसली
बुलडाण्याच्या रायपूर येथील फुलोरा या वाईनबारला चोरांनी फोडून आतच दारू ढोसली व 16 हजार 300 रुपयांच्या दारूच्या बाटल्याही चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी त्यांनी वाईनबार मध्येच दारूच्या बाटल्या ही फोडल्या.
बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील मेन रस्त्यावर सुनील देशमाने यांचे फुलोरा नावाने वाईनबार आहे. लॉकडाऊनमुळे बार बंद आहे. रविवारी 5 एप्रिलला मध्यरात्री अज्ञात चोरांनी शटरचे कुलूप तोडून लोखंडी रॉडने वाकून आत प्रवेश केला. आश्चर्य म्हणजे या चोरांनी बारमध्येच बसून दारु प्याली आणि परत जातांना त्याच दारूच्या बाटल्या फोडल्या. त्यानंतर 16 हजार 300 रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरल्या.
याबाबत आज सोमवारी 6 एप्रिल रोजी रायपूर येथील सुभाष कोकाने यांनी वाईनबार मालक यांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून श्वानला पाचारण करण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी जावून श्वान परतला. या प्रकरणी अज्ञात चोरांविरुद्ध रायपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.