भंडारा - कोरोना काळात भंडारा जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील नागरिकांसाठी विश्वासाचे एक नाव ठरले ते म्हणजे स्पर्श हॉस्पिटलचे डॉक्टर राजदीप चौधरी यांचे. सप्टेंबर 2020 ते मे 2021 या कालावधीत तब्बल 17 हजार कोरोना रुग्णांवर त्यानी उपचार केले आहे. त्यातले पंधराशे रुग्ण तर अति दक्षता विभागातील होते. रुग्णांवर उपचार करतांना स्वतःलाही कोरोना झाल्यानंतर ही रुग्णांची 24 तास अविरत सेवा केली. मात्र तरीही या महामारीत काही लोकांचे प्राण वाचवू शकलो नाही, हा अनुभव सांगताना डॉक्टर चौधरी यांचे डोळे पाणावले होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेकडो लोकांच्या प्राण वाचवताना माझ्याकडून काही चुका झाल्यास त्यांनी माफी सुद्धा मागितली आहे. त्यांनी सांगितलेल्या अनुभवातून एक देव माणूस आम्ही पहिला.
उपचाराचे अनुभव नोव्हतें होता तो आत्मविश्वास..
2020 मध्ये जेव्हा भंडाऱ्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्यानंतर फक्त आणि फक्त शासकीय रुग्णालयातच कोरोना रूग्णांवर उपचार होत होते. मात्र सप्टेंबर महिनामध्ये भंडारा जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे शासकीय रुग्णालयात जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. तेव्हा कोरोना रूग्णांसाठी डॉक्टर राजदीप चौधरी हे आशेचे किरण ठरले. शासनाकडून रीतसर परवानगी घेऊन सप्टेंबर 2020 मध्ये त्यांनी त्यांचा रुग्णालय सुरू केला. सुरुवातीला 37 रुग्णांसाठी बेडची व्यवस्था केली. कोरोना हा सर्वच वैद्यकीय क्षेत्रासाठी नवीन होता. त्यामुळे त्याच्या उपचाराविषयी अनुभव नव्हता. मात्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोनावर उपचार सुरू केले.
भंडारा जिल्ह्यातील तब्बल १७ हजार रुग्णांवर डॉ. राजदीप चौधरींनी केले उपचार.. स्वतःला कोरोना झाल्यावरही 24 तास सेवा..
स्वतःच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांचा उपचार सुरू केल्यानंतर डॉ. राजदीप चौधरी यांना सुद्धा कोरोना झाला. मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी रुग्णांचे उपचार बंद न करता 24 तास अविरत सेवा दिली. त्यांच्याकडे सर्वात प्रथम अतिशय गंभीर परिस्थितीत आलेल्या रुग्णांचा अनुभव सांगताना डॉ. चौधरी म्हणाले, तो रुग्ण अगदी मरणाच्या दारावर होता. त्याची ऑक्सिजन पातळी केवळ 50 टक्के होती. मात्र विश्वासाने आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सर्व परीने उपचार केला आणि पंधरा दिवसानंतर तो रुग्ण बरा होऊन त्यांच्या घरी गेला. रुग्ण घरी जात असताना त्यांच्या चेहर्यावरचा आनंद पाहून खऱ्या अर्थाने आमच्या कामाचे फळ आम्हाला मिळाले. मी आणि माझा संपूर्ण स्टाफने रुग्णांची सेवा केली. त्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णांनी आणि त्यांचे नातेवाईक यांनी आमच्यावर जो विश्वास व्यक्त केला, त्यामुळेच सतत सेवा देण्याची ऊर्जा निर्माण झाल्याचे त्यानी सांगितले.
काही लोकांना वाचवू न शकल्याच्या वेदना..
दुसरा लाटेमध्ये खऱ्या अर्थाने कोरोनाने रौद्र रूप दाखविले. आम्ही हतबल झालो होतो. लोकांना ऑक्सिजन लागत होता मात्र ती आम्ही देऊ शकतो नाही. बऱ्याच लोकांना खुर्चीवर बसून ऑक्सीजन देऊन त्यांचा प्राण वाचविले. आम्ही शक्य तेवढे प्रयत्न केले मात्र तरीही काही लोकांचे प्राण वाचवू शकलो नाही ते सांगतांना डॉक्टर चौधरींचे डोळे पाणावले होते.
17 हजार रुग्णांवर केले उपचार..
दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक लोकांना कोरोनाची झळ पोहोचली. कोरोनाच्या उपचारासाठी प्रत्येक व्यक्ती डॉ. चौधरी यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करीत होता आणि त्यामुळे दर दिवशी 300 कोरोनाचे रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी यायचे. सप्टेंबर दोन 2020 पासून तर मी 2021 पर्यंत त्यांनी 17,000 कोरोना रुग्णांना उपचार दिला. या कालावधीत अनेक वाईट अनुभव आले. मात्र चांगल्या अनुभवा पुढे वाईटाचा विचार न करता शक्य तेवढे चांगले देण्याचा मी प्रयत्न केला. आज रुग्ण विश्वासाने आमच्या रुग्णालयात येत असतील तर हीच आमच्या कामाची खरी पावती आहे. कोरोना काळातील ते दिवस आयुष्यात कधीही न विसरणारे आहेत असे त्यांनी सांगितले. आज समाजात काही डॉक्टरांमुळे डॉक्टरांची प्रतिमा चुकीची झाली आहे.मात्र स्वतःचे सर्वस्व अर्पण करून रुग्णांना बरे होण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वच डॉक्टर चुकीचे नसतात असे त्यांनी या वेळी सांगितले. जर काही चुका झाल्या असल्यास त्या भविष्यात सुधारता येतील, असे ते म्हणाले.