भंडारा - जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये झालेल्या जळीत अग्निकांडानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मंत्र्यांपासून तर विविध पक्षातील नेतेमंडळींनी हजेरी लावणे सुरू केले आहे. परंतु नागरिकांना अपेक्षित असलेला चौकशी अहवाल अजूनही पुढे आलेला नाही. मात्र, त्यातल्या त्यात नेतेमंडळींचा रुग्णालयाला भेटी देण्याचा प्रकार सतत सुरू असल्याने संतापलेल्या नागरिकांनी, हे पर्यटन क्षेत्र नाही, कृपया कोणीही नेतेमंडळी यानंतर येऊ नका त्यापेक्षा चौकशी समितीचा अहवाल लवकर सादर करा, अशी मागणी केली आहे.
आतापर्यंत 15 च्यावर मंत्री व नेते येऊन गेले -
ही घटना घडल्यानंतर स्थानिक आमदार आणि विविध पक्षाच्या नेत्यांनी सुरुवातीला रूग्णालयाला भेट दिली. दहा नवजात बालकांचा मृत्यू ही अतिशय मोठी घटना असल्यामुळे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहमंत्री विरोधी पक्षनेते यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, एवढ्यापुरताच नेतेमंडळी थांबले नाही. त्यानंतरही विविध मंत्री आणि विविध पक्षातील नेते मंडळी यांची रेलचेल सतत सुरू राहिली. आतापर्यंत जवळपास 15 च्यावर मंत्री आणि नेते मंडळी भेट देऊन गेले आहे.
या पुढे जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊ नये -
वारंवार नेतेमंडळी येत असल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी या नेतेमंडळींना एक आग्रहाची विनंती केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय हे पर्यटन क्षेत्र नाही. तसेच इथे तुम्ही वारंवार येत आहात मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री यासारखे नेते आल्यावरही नागरिकांना कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. तेव्हा तुमच्या येण्यामुळे यापेक्षा वेगळे काय होणार आहे. तसेच तुमच्या येण्यामुळे चौकशी समितीच्या कार्यात व्यत्यय निर्माण होतो. आम्हाला तुमची नाही, तर चौकशी अहवालाची वाट आहे, असा संताप नागरिक व्यक्त केला आहे.