महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सामाजिक न्याय भवनात ध्वजदिन निधी कार्यक्रमाचे आयोजन; निधी संकलनाचा शनिवार पासून शुभारंभ

सैनिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ध्वजदिन निधी संकलनात प्रत्येक भारतीयाने सढळ हाताने योगदान देवून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.

bhandara
कार्यक्रमाचे दृश्य

By

Published : Dec 8, 2019, 8:39 AM IST

भंडारा- सीमेवर प्राणाची बाजी लावून देश वासीयांचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती व त्यांच्या कुटुंबीयांप्रती समाजातील प्रत्येक व्यक्तींच्या मनात प्रेम, जिव्हाळा व आदर असावा. सैनिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ध्वजदिन निधी संकलनात प्रत्येक भारतीयाने सढळ हाताने योगदान देवून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे दृश्य

सामाजिक न्याय भवन सभागृहात ध्वजदिन निधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. लहानपणी सैनिकांच्या पोशाखाप्रती आदर निर्माण झाला. आपण सैनिक व्हावे असे वाटले. त्यातूनच सैनिकांप्रती काही करण्याची तळमळ मनात निर्माण झाली. महसूल विभागात असताना माजी सैनिक असलेल्या कारकुनाकडून त्यांचे सैन्यातील अनुभव ऐकले. त्यामुळेच शिस्त कशी असावी हे कळले. सैनिकांप्रती प्रेम, जिव्हाळा व आदर निर्माण झाला, अशा भावना यावेळी रवींद्र जगताप यांनी व्यक्त केल्या. याच भावनेतून माजी सैनिकांना सहकार्य करा. माजी सैनिकांना शासनातर्फे जी मदत मिळते ती तुटपुंजी आहे त्यात वाढ करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला शहिदांच्या प्रतिमेसमोर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विरमाता विमल केवलदास बन्सोड, सिता भागवत माटे, जनाबाई सदानंद मडामे व विरपत्नी उर्मिला गणपत तितिरमारे, जाती हिरामन सिंद्राम या मान्यवरांचा भेटवस्तू, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिकांचे पाल्य भूषण चंद्रभान कारेमोरे यास १० हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देण्यात आले. सरीता लुटे यांनी १ हजार १११ चा धनादेश ध्वजदिन निधीसाठी सुपूर्द केला.

प्रास्ताविकात धनंजय सदाफळ यांनी सशस्त्र सेना ध्वजदिनाचे महत्व सांगून जिल्ह्याला २०१८ करीता दिलेला इष्टांक २८ लक्ष ४५ हजार ९२० रुपये वेळेच्या आत पूर्ण केल्याचे सांगितले. यावर्षी ध्वजदिन निधी संकलनाचे जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट २८ लक्ष ४५ हजार रुपये हे सहज पूर्ण करू, अशी ग्वाही सदाफळ यांनी दिली. जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा तसेच अवलंबितांचे कोणत्याही कार्यालयाकडे प्रकरणे असतील तर त्यांनी जिल्हा सैनिक कार्यालयाकडे एकत्रितपणे पाहोचवावेत. तसेच माजी सैनिकांच्या चरितार्थ ६ हजार, शालेय मदत ६८ हजार, व्यावसायिक मदत ६ लाख, मंतिमंद पाल्यास २१ हजार ६०० रुपये, स्वंयसहायता मदत ३ लाख रुपये, अंत्यविधी, मुलींचे लग्न आदिंसाठी निधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लालबहादूर विद्यालय भंडारा येथील विद्यार्थिंनींनी सैनिकांच्या प्रती गीत गायन करून उपस्थितांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमात विरमाता, विरपत्नी, माजी सैनिक, त्यांचे पाल्य तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा-भंडारा नगर परिषदेचा भोंगळ कारभार, चांगल्या नाल्याच्या ठिकाणीच १४ लाखांच्या नवीन नाल्याचे बांधकाम

ABOUT THE AUTHOR

...view details