भंडारा - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भाजपाने सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी भंडारा शहरात मोर्चा काढण्यात आला. शास्त्री चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेमध्ये बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांचे शासन हे लुटारू चे शासन असल्याची टीका केली.
विविध मागण्यांसाठी काढला मोर्चा-
भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि जनसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन आज 25 रोजी करण्यात आले होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत चुकारे, धान उत्पादकांची खरेदी केंद्रावर होणारी लूट, पूरग्रस्तांना अजूनही न मिळालेली मदत आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील जळीत कांडातील मृत बालकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, अशा अनेक मागण्यांना घेऊन मोर्चा काढण्यात आला.
शहरातील साखरकर मंगल कार्यालयापासून जिल्हाभरातून आलेले पाच हजाराहून अधिक भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुनील मेंढे, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले. गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मोर्चा पुढे निघाला. यावेळी शासन विरोधी घोषणा आणि हातात घेतलेले फलक लक्षवेधी ठरत होते. काही आंदोलन कर्ते ट्रॅक्टर सह यात सहभागी झाले होते.
मिळेल तिथून माल कमाविणे हाच या सरकारचा धंदा-
आघाडी सरकारची मागच्या वर्षभरातील सर्वात प्रभावी योजना म्हणून भ्रष्टाचाराच्या योजनेकडे पहावे लागेल. मिळेल तिथून माल कमाविणे हाच या सरकारचा धंदा झाला आहे. विदर्भाचा राग मनात धरून वागणाऱ्या या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. नोटांच्या बंडला पुढे आंधळे झालेल्या सरकारला गोरगरीब, माता आणि शेतकऱ्यांच्या व्यथा दिसेनाशा झाल्या आहेत. अशा सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत, उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी आजचा मोर्चा ही सुरुवात आहे. हा संघर्ष न्याय मिळेपर्यंत असाच सुरू राहील, अशा शब्दात भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सरकारला सुनावले.
भ्रष्टाचारात पारंगत सरकार-
जिल्हाधिकारी कार्यालय चौकात पोलिसांनी मोर्चा अडवून धरल्यानंतर त्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी "ठाकरे सरकार बेईमान सरकार" अशा घोषणेने सुरुवात केली. भ्रष्टाचारात पारंगत झालेल्या या सरकारमधील मंत्र्यांना सर्वसामान्यांच्या वेदना अजून समजल्या नाहीत. शेतकरी, गरीब, शेतमजूर यांचे रडगाणे ऐकायला त्यांना वेळ नाही. धान खरेदी केंद्राची संकल्पना शेतकऱ्यांसाठी वरदान असताना ही व्यवस्था उध्वस्त करण्याचे काम आघाडी सरकार करीत आहे.