भंडारा- पूर्व विदर्भात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. भंडारा जिल्ह्यातदेखील 31 डिसेंबरपासून अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. सतत तीन दिवस कमी-जास्त स्वरूपाचा पाऊस संपूर्ण जिल्ह्यात पडला आहे. तर, गुरुवारी पावसाने सकाळी दहा वाजेपासून हजेरी लावली. यात शासकीय धान्य खरेदी केंद्रामध्ये विक्रीसाठी नेलेले धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दुसरीकडे गोडाऊन संपूर्ण भरलेले असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचे धान खरेदी करू शकत नसल्याने धान उघड्यावर असल्याचे सेवा सहकारी संस्थेचे व्यवस्थापक सांगत आहेत. यावर्षी शासनाने धानाला सातशे रुपये बोनस जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांनी धान्य विक्रीसाठी आधारभूत धान खरेदी केंद्राकडे धाव घेतली. 1 हजार 815 रुपये हमीभाव आणि सातशे रुपये बोनस असे पंचवीसशे रुपये प्रतिक्विंटल दर पडत असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या ठोकळ धान्यासह बारीक धान्यही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विकण्यासाठी आणले. त्यामुळे, संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांचे गोदाम पूर्णपणे भरले आहेत.