भंडारा -महाराष्ट्रात झालेल्या सत्ता बदलाचा प्रभाव पवनी नगर परिषदेमध्येही पाहायला मिळत आहे. डिसेंबर २०१६ ला झालेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच स्थापन झालेल्या नगर विकास आघाडीच्या पूनम काटेखाये या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या, सोबतच त्यांच्या पक्षाचे ६ नगरसेवकही निवडून आले. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी आणि शिवसेनेने समर्थन दिल्याने सत्ताही स्थापन झाली. मागील ३ वर्षात नगर विकास आघाडीचे संस्थापक आणि नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य विलास काटेखाये यांनी एकहाती सत्ता चालवली. मात्र, नगर विकास आघाडीच्या ५ नगरसेवकांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीतील नगरसेवकांना सोबत घेऊन नगराध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला.
पवनी नगरपरिषदेत नगर विकास आघाडीचे ५, काँग्रेसचे ५, भाजपचे २, राष्ट्रवादीचे ३ तर, सेनेचा १ असे मिळून १७ नगरसेवक निवडून आलेत. तरी संपूर्ण सत्ता ही विलास काटेखायेंजवळ केंद्रित होती. ३ वर्षाच्या कार्यकाळात नगराध्यक्षांनी अनेक विकासकामे हातात घेतली. मात्र, यात आघाडीच्या नव्हे तर अन्य नगरसेवकांना विश्वासात न घेतल्यामुळे असंतोष आघाडीचे ५ नगरसेवक फुटून काँग्रेसचे ५, राष्ट्रवादीचे २ तर सेनेच्या एका नगरसेवकाला सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यामुळे नगर विकास आघाडीत बिघाडी आल्याची चर्चा गावात रंगत आहे.
नगराध्यक्षा म्हणून पूनम काटेखाये या निवडून आल्यापासून त्यांचे पती आणि परिषदेचे स्वीकृत सदस्य विलास काटेखाये हेच नगर परिषदेचे काम पाहत असल्याचा आरोप या अविश्वास प्रस्तावात दाखल केला आहे. कोणत्याही नगरसेवकांना विश्वासात न घेता नगराध्यक्षाचे पती आर्थिक हित जोपासत आहे. ते जास्त रकमेची कामे अन्य ठेकेदाराच्या नावाने घेऊन स्वत:च्या मर्जीतील लोकांकडून कामे करवून घेत असल्याचा ठपका जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आला आहे. दिलेल्या मागणी पत्रात १६ कामांचा उल्लेख करण्यात आला असून या कामाची एकूण किमत २० कोटींच्या वर आहे. याबाबत चौकशी करून महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत आणि औद्योगिक नागरी अधिनियमनानुसार कार्यवाही करून नगराध्यक्ष पूनम काटेखाये यांना पायउतार करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.