भंडारा -शरद पवार आणि अमित शाह यांची गुजरातमध्ये भेट झालीच नाही, असे ट्विट करून संजय राऊत यांनी ते कोणाचे प्रवक्ते आहेत हे सिद्ध केले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतविषयी म्हटले आहे. तर प्रवीण कुंटे कोण मी ओळखत नाही, असे म्हणून त्यांची खिल्ली उडवली आहे. चीनवरून कोरोना आणणारे भाजपा स्वतः लॉकडाऊन करतात, मात्र उद्धव ठाकरे शासनाने लॉकडाऊन करण्याचा विचार केला तर विरोध करण्याची भूमिका घेतात, असा दुटप्पी चेहरा या भाजपा नेत्यांचा आहे, असेही ते म्हणाले, येथील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
हेही वाचा -शरद पवार-अमित शाह यांची भेट झाली तर यात चुकीचं काय : संजय राऊत
'शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नाही'
पुढे ते म्हणाले, की संजय राऊत यांनी आमच्या नेत्यांचा अपमान केला, म्हणून मी माझी भूमिका मांडली. शिवसेना हा यूपीएचा घटक पक्ष नाही. तरीही आमचे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविषयी ते वारंवार आपले मत मांडत होते. आमच्या नेत्यांविषयी तुम्ही मत मांडू नका, असे सांगितल्यानंतरही त्यांनी त्यांचे वक्तव्य बंद न केल्यामुळेच मी त्यांना राष्ट्रवादीचा प्रवक्ता म्हटले होते. काल त्यांनी ट्विटरद्वारे शरद पवार आणि अमित शाह यांची गुजरातमध्ये भेट झालीच नाही, असे ट्विट करून ते शरद पवारांचे प्रवक्ते आहेत हे सिद्ध केले आहे, असे ते म्हणाले.
'भाजपा दुटप्पी'
कोरोना हा चीनवरून भाजपाने आणला आहे. मोदी शासनाने लोकांना विश्वासात न घेता लॉकडाऊन लावला होता. लॉकडाऊनच्या काळात 2 लाख कोटी हे लोकांसाठी घोषित केले होते. ते तर दिलेच नाहीत. उलट थाळी आणि चमचे वाजवून कोरोना जातो, असे सांगितले. नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन केला तो योग्य मात्र उद्धव ठाकरे लॉकडाऊनचा विचार करत आहत, तर आम्ही त्यांचा विरोध करू, अशी दुटप्पी भूमिका भाजपाचे नेते घेत आहेत, हे अतिशय अशोभनीय कृत्य आहे, असे ते म्हणाले. लॉकडाऊन रात्रीचा असण्यावर आमचा भर असेल, असेही त्यांनी सांगितले.