भंडारा -आरोग्य विभागाची ग्रुप-डी करीता ३१ ऑक्टोंबरला संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा नियोजित करण्यात आली होती. त्यात शासकीय स्तरावरील अश्या परीक्षेचा प्रथमच तुमसर शहरातील शाळा-विद्यालय स्तरावर घेण्यात आल्या होत्या. मात्र आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका महाराष्ट्रभरातून आलेल्या बेरोजगार युवकांना सहन करावा लागला आहे. तुमसर शहरातील शारदा विद्यालय ह्या परीक्षा केंद्रावर विभागीय स्तरावरून बैठक क्रमांकाचा चांगलाच घोळ दिसून आला आहे. तर मोहाडी येथील परीक्षा केंद्रावर एकतासाधी पेपर फुटल्याचे आरोप विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने बेरोजगार युवकांची थट्टाच मांडण्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यात सदर परीक्षाच राज्य शासनाने रद्द करून पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.
तुमसर येथे झाला रोल नंबरचा घोळ -
तुमसर शहरातील राष्ट्रीय विद्यालय, नेहरू तथा शारदा विद्यालयात आरोग्य विभागाच्या ग्रुप-डीची परीक्षा रविवारला नियोजित होती. प्रत्येक परीक्षा केंद्राचा हा शासकीय नोकरी संदर्भातील पहिलाच अनुभव होता. मात्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची नियोजन शून्यता नेमकी शारदा विद्यालयात अनुभवास आली आहे. महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, अमरावती, अकोला, नागपूर तसेच मराठवाड्यातील इतर ठिकाणाहून विद्यार्थी परिक्षेकरीता वेळेत हजर झाले होते. मात्र कित्येकांच्या प्रवेश पत्रावर शारदा विद्यालय केंद्र असूनही बैठका क्रमांक तिथे उपलब्धच नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यात अनेकांचे रोल नंबर सारखेच मात्र रोल लिस्टवर तिसऱ्याचाच फोटो आणि बैठक क्रमांक आढळून आले आहे. त्यामध्ये विलास विष्णू तायडे व योगेश परमानंद नंदागवळी या दोन्ही विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक २४१०१२१ असा असल्याने परीक्षा द्यायची कशी? यावर भंडारा येथून आलेल्या अधिकाऱ्यांनी कसलेच मार्गदर्शन केलेले नाही. त्यातून परीक्षा केंद्रावर काही काळ तणावाची स्थिती उद्भवली होती.
150 विद्यार्थ्यांचे रोल नंबर मिळाले नाही -
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल १५० विद्यार्थ्यांचे रोल नंबर परीक्षा केंद्रावर उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यात २४०९८७४ पासून ते २४१०१३७ अशा बैठक क्रमांकाची व्यवस्था शारदा विद्यालयात करण्यात आली होती. मात्र २४१०१३८ पासून ते २४१०२९४ या मधील १५० विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर केंद्र नमूद असूनसुद्धा परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. येथे आरोग्य विभागाने २५ ऑक्टोंबर पूर्वीच्या प्रवेश पत्रांना अवैध ठरवून नवीन हॉल तिकीट डाऊनलोड करण्याकरीता परिपत्रक काढले होते. त्यातही नवीन प्रवेश पत्र काढलेल्या विद्यार्थ्यांचे बदललेले रोल नंबर केंद्रावर उपलब्ध नव्हते. परीक्षा समय विवेकाने या विद्यार्थ्यांसाठी एका वर्गखोलीत व्यवस्था केली मात्र या पैकी केवळ 28 विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली आरोळी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.