भंडारा- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांचा भंडारा जिल्ह्यात नाश्त्याच्या टपऱ्या, पानटपऱ्या, किराणा दुकानांमध्ये पुड्या बांधण्यासाठी उपयोग केला जात असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याची तक्रार सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी विद्यापीठाला केल्यानंतर भंडारा पोलीस ठाण्यामध्ये त्याचा पंचनामा होऊन विद्यापीठाने या उत्तरपत्रिका सध्या ताब्यात घेतल्या आहेत. निष्काळजी करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी सिनेट सदस्यांनी केली आहे.
विद्यापीठाच्या बीएस्सी आणि एमएस्सीच्या परीक्षेचे मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकांची काही पोती भंडाऱ्यात पोहचली. त्यानंतर पान टपरी आणि किराणा दुकानांमध्ये ही रद्दी म्हणून विकली गेली. उत्तर पत्रिकांचा उपयोग एका टपरीवर ग्राहकांना भजी देण्यासाठी केला जात होता. एका ग्राहकाला ही उत्तरपत्रिका दिसल्यानंतर त्यांनी हा प्रकार सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे आणि माध्यमांच्या समोर आणला. त्यानंतर अशा उत्तर पत्रिका अजून किती प्रमाणात भंडाऱ्यात आहेत? याची चौकशी केली असता काही पोत्यांमध्ये उत्तरपत्रिका आढळून आल्या. याची तक्रार नागपूर विद्यापीठाला केली गेली.