महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 8, 2021, 2:42 PM IST

Updated : Jan 8, 2021, 3:17 PM IST

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांनी केली गोसे धरणाची पाहणी; पालकमंत्र्यांची अनुपस्थिती, प्रकल्पग्रस्तांची निराशा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्ह्याच्या महत्त्वाकांक्षी गोसे प्रकल्पाची पाहणी केली. धरणाला 1983 मध्ये मंजुरी मिळाली होती. 1988 मध्ये राजीव गांधींच्या हस्ते त्याची पायाभरणी केली. मात्र, इतक्या वर्षांमध्ये धरण पूर्ण झाले नाही. 372 कोटींचा धरणाचा खर्च आजपर्यंत 18 हजार 195 कोटी इतका झालेला आहे. अजूनही जवळपास चार हजार कोटींचा खर्च बाकी आहे. दरम्यान, मुख्यमंत्री येणार असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम येतील, ही अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र, ते उपस्थित नसल्याने चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्यूज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्यूज

भंडारा - जिल्ह्याच्या अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या गोसे प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली आहे. मागील वर्षापासून हा प्रकल्प अजूनही अपुरा असल्याने नेमका कोणत्या अडचणी आहेत, याचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी घेतला. प्रकल्पाची पाहणी करून ते पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न करू, तसेच धरणग्रस्त लोकांच्या समस्या ही लवकरच सोडवू असे त्यांनी सांगितले. मात्र, या दौऱ्यात पालकमंत्री नसल्याने जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांनी केली गोसे धरणाची पाहणी; पालकमंत्र्यांची अनुपस्थिती, प्रकल्पग्रस्तांची निराशा
मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच गोसेला भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच गोसे धरणाच्या पाहणीसाठी आले होते. त्यांनी गोसे धरणाची सद्यस्थिती त्याच्या समस्या त्यांना लागणाऱ्या गोष्टी याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यांच्यासह भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडकर आणि गोसे प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते. धरणाच्या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'या अगोदर मी कोयना धरणाचीसुद्धा पाहणी केली. त्यानंतर आज गोसे धरणाची पाहणी करण्यास आलेलो आहे. हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना कोणत्या अडचणी येताहेत, त्या जाणून घेण्यासाठी आणि लोकांना काय हवे आहे, हे जाणून घेण्यासाठी मी आज आलेलो आहे. हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न करणार आहोत.'

मुख्यमंत्र्यांनी केली गोसे धरणाची पाहणी
मुख्यमंत्र्यांनी केली गोसे धरणाची पाहणी
1983 मध्ये मंजुरी, 1988 मध्ये पायाभरणी, तरीही 33 वर्षात काम अपूर्णच

या गोसे धरणाला 1983 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर 1988 मध्ये राजीव गांधी यांच्या हस्ते त्याची पायाभरणी केली. मात्र, मागील काही वर्षांमध्ये धरण पूर्णत्वास गेले नाही. 372 कोटींचा धरणाचा खर्च आजपर्यंत 18 हजार 195 कोटी इतका झालेला आहे. अजूनही जवळपास चार हजार कोटी खर्च करणे बाकी आहे. अजूनही धरणाचा डावा कालवा आणि उजवा कालवा अपूर्णच आहे. तसेच, गोसे धरणातील प्रकल्पग्रस्त लोकांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्या अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे कित्येक नेते आले आणि गेले. मात्र, धरण अपुरेच राहिले. शेवटी या धरणाची किंमत दरवेळेस वाढतच गेली. धरण पूर्ण झाल्यास भंडारा नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास अडीच लक्ष हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.

हेही वाचा -एकनाथ शिंदे कोल्हापुरात, इतिहासात प्रथमच नगरविकास मंत्र्यांची महापालिकेला भेट

मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्त लोकांची भेट घेतली नाही

धरणातील प्रकल्पग्रस्त लोकांशी मुख्यमंत्री संवाद साधतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी धरणाची पाहणी केल्यानंतर ते राजीव टेकडी येथे अधिकाऱ्यांशी चर्चा करून निघून गेले. त्यामुळे बऱ्याच धरणग्रस्त लोकांची निराशा झाली.

जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम उपस्थित नसल्याने चर्चा

मुख्यमंत्री येणार त्यामुळे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम येतील, ही अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र, पालकमंत्री विश्वजीत कदम हे उपस्थित न झाल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय निर्माण झालेला आहे.


हेही वाचा -'मुंबई सेंट्रल' स्थानकाच्या नामांतरावर काय म्हणतात मुंबईकर?

Last Updated : Jan 8, 2021, 3:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details