भंडारा -'आई मला माफ कर, तुझी लाडकी...' असे पत्र लिहून एका महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात शनिवारी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही अधिकारी अवघ्या 27 वर्षाची होती. शीतल फाळके असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्या लाखनी येथे तालुका महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
शीतल या मूळच्या सातारा जिल्ह्यातील परडी येथील रहिवासी होत्या. शीतल या महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या माध्यमातून तीन वर्षापूर्वी लाखनी येथे महिला व बाल विकास अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. अत्यंत हुशार आणि मनमिळाऊ म्हणून त्यांची ओळख होती. दोन महिन्यापूर्वीच त्यांच्याकडे पवनी येथील अतिरिक्त प्रभारही देण्यात आला होता. आईसोबत त्या भाड्याच्या घरात राहत होत्या.
गळफास घेऊन केली आत्महत्या
6 मार्चच्या रात्री आईसोबत टीव्ही बघितल्यानंतर दोघीही झोपी गेल्या. दरम्यान, पहाटे तीन वाजताच्या सुमारास प्रसाधनगृहात गेलेल्या आईला शीतल या गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्या. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्याचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर शीतल यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. शीतलचे कुटुंबीय मृतदेह घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघाले आहेत.