भंडारा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप खासदार सुनील मेंढे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. येथील लक्ष्मी सभागृहात या शिबिराचे आयोजन केले गेले. खासदार मेंढे यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. तसेच जास्तीत जास्त तरुण मंडळींनी या कोरोनाच्या कठीण काळात रक्तदान करावे, असे आवाहन केले. यानुसार जवळपास 100 लोकांनी या शिबिरात रक्तदान केले.
खासदार सुनिल मेंढे याबाबत बोलताना कोरोनाचा काळ सुरू असल्याने माझ्या वाढदिवसानिमित्त मोठे कार्यक्रम साजरे करू नका, वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले होते. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यासारख्या अत्यंत गरजेच्या वस्तू मंत्री गडकरी यांनी संपूर्ण विदर्भात तातडीने उपलब्ध करून दिल्या. मात्र, कोरोना कालावधीत रक्ताची गरज भासत आहे. ती पूर्ण व्हावी, यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी रक्तदान करावे, या पार्श्वभूमीवर या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा -भंडारा : देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट
खासदार यांनी स्वतःही केले रक्तदान -
'प्रचंड दूरदृष्टी आणि अशक्य ते शक्य करून अडचणींवर मात करणारे नितीन गडकरी आज सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून आहेत. लोकांसाठी सदैव झटणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला रक्तदान महायज्ञच्या माध्यमातून शुभेच्छा देताना आनंद होत असल्याचे सांगून या सेवा वृत्तीला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना परमेश्वराकडे करतो', या शब्दात खासदार मेंढे यांनी गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर खासदार मेंढे यांनीही या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. आतापर्यंत जवळपास 20 ते 25 वेळा रक्तदान केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महिन्याला 700 बॅग रक्त लागतो. मात्र, सध्या मोठा तुटवडा -
भंडारा जिल्ह्याला महिन्याकाठी 700 बॅग रक्त लागत आहे. कोरोना काळात रक्तदान शिबिर कमी प्रमाणात झाले. रक्तदाते ही कमी प्रमाणात बाहेर आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जिल्ह्याला जाणवत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ही माहिती खासदार सुनील मेंढे यांना दिल्यानंतर त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यात जवळपास 100 लोकांनी या शिबिरात रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या लोकांना खासदारांनी स्वतःचे प्रशस्तीपत्र आणि एक झाड दिले.
हेही वाचा -शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपाचे आंदोलन, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात