भंडारा - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या खासदार सुनील मेंढे व माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या संचारबंदी आहे, परंतु असे असताना देखील जमाव जमावल्याने ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच सर्वांना सोडून देखील देण्यात आले. मात्र या प्रकाराने काही काळ तुमसरमधील खापा चौकात तणावाचे वातावर निर्माण झाले होते, तसेच वाहतूक देखील बंद झाली होती.
जिल्ह्यात उन्हाळी धान कापून तयार असून, सरकारकडून केवळ धान खरेदी करण्याबाबत घोषणा झाली, मात्र अद्याप जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे एक क्विंटन धान देखील खरेदी करण्यात आले नाही. त्यामुळे तुमसर- मोहाडी तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्र सुरु करण्यात यावेत, तसेच खरीप हंगामातील बोनसचे पैसे शेतकऱ्यांना मिळावेत, धान खरेदीच्या अटी शिथील करण्यात याव्यात अशा विविध मागण्यांसाठी आज तुमसर तालुक्यातील खापा चौकात भाजपाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
'गोदामे खाली नसल्याने धान खरेदी रखडली'
दरम्यान धान खरेदी करण्यासाठी तुमसर आणि मोहाडी तालुक्यात गोदामे खाली नसल्याने, धान खरेदी अजून सुरू करण्यात आली नसल्याची माहिती जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर गोदाम कमी पडल्यास तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत धान खरेदी करावी. समितीला धान खरेदी सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी चरण वाघमारे यांनी केली आहे. धान खरेदीबाबत 20 मे रोजी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्यापही निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यं आंदोलन सुरूच राहाणार असल्याचा इशारा यावेळी वाघमारे यांनी दिला आहे.
तुमसरमध्ये भाजपाचे आंदोलन 'मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार'
उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी दरवर्षी एक मेपर्यंत खरेदी केंद्र सुरू केले जातात. या वर्षी 24 मे आला तरी अजूनही खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर आपले धान विक्री करावे आणि शासनाने त्यांचा पैसा त्यांच्या खात्यात जमा करावा एवढा सोपा विषय आहे. मात्र आघाडीचे शासन आल्यापासून या धान खरेदी केंद्रांवर निव्वळ घोटाळे होत आहेत. शेतकऱ्यांचा बोनस सुद्धा त्यांना मिळालेला नाही. कोरोनाच्या काळातही शेतकऱ्यांना शासनातर्फे कोणतीही मदत मिळाली नाही. या संकट काळातही शेतकऱ्यांवर शासन अन्याय करत आहे. केवळ नागपूर, मुंबईवरून घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नाही. अशा या शासनाचा आम्ही निषेध करतो, आणि जोपर्यंत शासन आमच्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करणार नाही, त्यांच्या बोनसचे पैसे देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असेच सुरू ठेवू , असं यावेळी सुनील मेंढे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -'बार्ज'वरील ८ कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले गुजरातच्या वलसाड किनाऱ्यावर