भंडारा- मतमोजणीनंतर भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी भाजपचे सुनील मेंढे हे विजयी झाले असून त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी नाना पंचबुद्धे यांचा तब्बल 1 लाख 97 हजार मतांनी पराभव केला आहे. संपूर्ण निवडणुकीत केवळ मोदींच्या नावाने मते मागितली गेली असल्याने विजयाचे संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदींनाच असल्याची प्रतिक्रिया सुनील मेंढे यांनी दिली.
आमचे प्रतिनिधी दिपेंद्र गोस्वामी यांनी निवडणुकांच्या निकालावर केलेले विश्लेषण सुनील मेंढे आणि नाना पंचबुद्धे हे दोन्ही नवखे उमेदवार होते. सुनील मेंढे हे सध्या भंडार नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत. तसेच नाना पंचबुद्धे माजी राज्यमंत्री आहेत.
नाना पटोले यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर भाजपतर्फे मोठे नाव नसल्याने कोणाला उमेदवारी मिळेल याची चर्चा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरू राहिली. कुणबी आणि आर्थिक बाब लक्षात घेऊन सुनील मेंढे यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खुद्द प्रफुल्ल पटेल मैदानात उतरतील अशी अशा वाटत असताना त्यांनी शेवटच्या दिवशी माघार घेत नाना पंचबुद्धे यांना अनपेक्षितपणे उमेदवारी देत मतदारांना आश्चर्याचा घक्का दिला.
सुनील मेंढे यांना सुरुवातीला त्यांच्याच पक्षातून मोठा विरोध झाला. मात्र, एकदा उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील सर्व विरोधक एकवटले आणि मोदींची सत्ता कायम राखण्यासाठी सुनील मेंढे यांचा प्रचार सुरू केला. प्रचार करताना सुनील मेंढे नाही तर मोदींना मतदान करा, असे कार्यकर्ते सांगत होते. खुद्द सुनील मेंढे यांनीही नरेंद्र मोदींच्या नावाने मते मागितली. त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी गोंदिया येथे एक विशाल सभा घेतली. यामध्ये त्यांनी मतदारांना हिंदुत्व, पुलवामा यासारख्या भावनात्मक गोष्टींच्या माध्यमातून मतांचा जोगवा मागितला. या सर्व गोष्टी सुनील मुंडे यांच्यासाठी सकारात्मक ठरल्या आणि ते विजयी झाले.
दुसरीकडे नाना पंचबुद्धे यांच्याकडे स्टार प्रचारक नसल्याने प्रफुल पटेल यांच्या खांद्यावर प्रचाराची संपूर्ण धुरा होती. केवळ शरद पवार यांनी एकदा प्रचार सभा घेऊन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याविरुद्ध प्रकर्षाने मुद्दे मतदानामुळे त्यांना मांडता आले नसल्याने त्यांच्या प्रचारातही प्रभाव झालेला नाही. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात समन्वयाचा अभाव होता. राष्ट्रवादीच्या बऱ्याच मोठ्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारामध्ये भाग न घेता घरी बसणे पसंत केले आणि याचा फटका राष्ट्रवादीला बसला.
या निवडणुकीत 14 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही सुनील मेंढे आणि नाना पंचबुद्धे यांच्यात होती. वंचित आघाडीचे कारू नान्हे आणि बहुजन पक्षाचे विजया बनकर हे देखील विशेष प्रभाव पाडू शकले नाही. या दोन्ही पक्षांन मिळून केवळ एक लाख मतदान घेतले.
भंडारा, गोंदिया जिल्हा म्हणून सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पैकी केवळ गोंदियामध्ये काँग्रेसचे आमदार असून उर्वरित पाच ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. सुनील मेंढे यांना प्रत्येक मतदारसंघातून मोठी लीड मिळाली. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेसाठी या सर्व उमेदवारांनी आपले तिकीट वाचवले असे म्हणता येईल, मात्र या लोकसभेच्या निकालाचा विधानसभेच्या निवडणुकीवर प्रभाव पडणार नाही, कारण विधानसभेतील प्रश्न वेगळे असतात. तसेच उमेदवार कोण असतील यावर निकाल अवलंबून असतो. त्यामुळे सध्याच्या लोकसभेच्या निकालाचा विधानसभेच्या निकालावर किती प्रभाव पडेल हे सांगणे सध्या तरी शक्य नाही.