महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शासन केवळ परिचारिकांवर गुन्हे दाखल करून डॉक्टर्सना वाचवण्याच्या प्रयत्नात - खासदार मेंढे

या प्रकरणी सुरुवातीला आरोग्य विभागाच्या चौकशीनंतर सात लोकांवर कारवाई करण्यात आली. यात दोन परिचारिका आणि एक डॉक्टर यांना बडतर्फ करण्यात आले. तर, दोन परिचारिका आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आले. तसेच, एका डॉक्टरची बदली करण्यात आली होती. या निलंबित आणि बडतर्फ लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी तेव्हापासूनच होत आलेली आहे. मात्र, आता परिचारिकांनी त्यांच्या कर्तव्यात हयगय केल्यामुळेच ही घटना घडल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

भंडारा नवजात बालकांच्या आयसीयूला आग
भंडारा नवजात बालकांच्या आयसीयूला आग

By

Published : Feb 20, 2021, 2:34 PM IST

भंडारा -जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगित 11 बालकांच्या मृत्यू प्रकरणात 39 दिवसांनंतर दोन 2 परिचारिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा भंडारा शहर पोलीस ठाण्यामध्ये नोंदविण्यात आला आहे. स्मिता अंबिलडुके (वय 34) व शुभांगी साठवणे (वय 32) वर्ष अशा गुन्हा नोंद झालेल्या अधीपरिचारिकांचे नाव आहेत. त्यांच्यावर कलम 304/2 व 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा तपास जिल्हा उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.

दरम्यान, केवळ दोन परिचारिकांवर कारवाई करून इतर डॉक्टरांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खासदार सुनील मेंढे यांनी केलेला आहे. तर, 'आम्ही आमचे कर्तव्य बजावत होतो. ही चूक आमची नसून प्रशासकीय यंत्रणेची आहे,' असे परिचारिकेने सांगितले.

शासन केवळ परिचारिकांवर गुन्हे दाखल करून डॉक्टर्सना वाचवण्याच्या प्रयत्नात - खासदार मेंढे
सुरुवातीला केवळ निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई

9 जानेवारी 2019 ला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शिशु केअर युनिटमध्ये आग लागून दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. महिन्याभरानंतर वाचलेल्या सात बालकांपैकी पुन्हा एका बालकाचा या अग्निकांडावेळी झालेल्या धुरामुळे मृत्यू झाला. या प्रकरणी सुरुवातीला आरोग्य विभागाच्या चौकशीनंतर सात लोकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन परिचारिका आणि एक डॉक्टर यांना बडतर्फ करण्यात आले. तर, दोन परिचारिका आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आले. तसेच, एका डॉक्टरची बदली करण्यात आली होती. या निलंबित आणि बडतर्फ लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी तेव्हापासूनच होत आलेली आहे. आरोग्य विभागाने तपासून या लोकांवर कारवाई केली होती. इतर यंत्रणेचा तपास झाल्यानंतरच त्यातून जे सत्य बाहेर येईल. त्यानुसार, कार्यवाही केली जाईल, असे शासनामार्फत सांगितले गेले होते.

पोलीस तपासात परिचारिका दोषी आढळल्या

आरोग्य विभागाच्या तपासणीनंतर इतर विभागातील तपासण्या सुरू होत्या. या चौकशीदरम्यान पोलीस विभागाच्या चौकशीत घटनेच्या वेळेस कार्यरत असलेल्या दोन्ही परिचारिकांनी त्यांच्या कर्तव्यात हयगय केल्यामुळेच ही घटना घडल्याचे तपासात समोर आले. त्यामुळेच त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस विभागाने दिल्यानंतर शुक्रवारी त्यांच्यावर भंडारा पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सांगण्यात येत आहे.

डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप

या प्रकरणात सुरुवातीला शासनाने अतिशय दिरंगाई केली. या संदर्भात 39 दिवसांनंतर एफआयआर दाखल करण्यात आले आहे. यात दोन कंत्राटी कर्मचारी स्मिता आंबीलढुके आणि शुभांगी साठवणे या केवळ दोन परिचारिकांवर कारवाई करून इतर डॉक्टरांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजप खासदार सुनील मेंढे यांनी केला आहे. तर, आम्ही आमचे कर्तव्य बजावत होतो. ही चूक आमची नसून प्रशासकीय यंत्रणेची असल्याचे एका परिचारिकेने सांगितले.

हे प्रकरण अतिशय गंभीर असून यानंतर अशा पद्धतीचे प्रकार होऊ नयेत, यासाठी शासनाने काहीतरी ठोस पावले उचलावी आणि उर्वरित लोकांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणीही मेंढे यांनी यावेळी केली.

आमचा दोष नसून प्रशासनाचा दोष असल्याचे परिचारिकेने सांगितले

'घटनेच्या दिवशी आम्ही सर्व बालकांना फीडिंग झाल्यानंतर रेकॉर्ड भरण्याचे काम करीत होतो. हे काम करण्यासाठी केअर युनिटच्या बाहेर व्यवस्था करण्यात आली असल्याने आम्ही बाहेर बसून रेकॉर्ड भरण्याचे काम करीत होतो. अचानक आवाज आल्यानंतर आम्ही आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र धुरामुळे आत जाणे शक्य झाले नसल्याने आम्ही मुलांना वाचवू शकलो नाही. मात्र, आम्ही त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या बिल्डिंगमध्ये फायर अलार्म आणि फायर एक्झिट असते तर, या मुलांना नक्कीच वाचविता आले असते. त्यामुळे हा दोष आमचा नसून शासनाने इमारत बांधल्यानंतर जी यंत्रणा उभारायला हवी होती, ती न उभारल्याने ही घटना घडली आहे. त्यामुळे ही चूक प्रशासनाची आहे, असे गुन्हा दाखल झालेल्या परिचारिकेने सांगितले. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे. आम्ही तेथून निर्दोष सिद्ध होऊ,' असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे. या दोन्ही परिचारिकांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असून 22 तारखेला त्यावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत पोलीस त्यांना अटक करतात किंवा नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details