महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संगणक-प्रिंटर खरेदीत घोटाळा? भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षांचा आरोप

भंडारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये कार्यरत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संगणक खरेदी करताना लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केला आहे.

Computer and printer purchase scam bhandara
संगणक आणि प्रिंटर खरेदी घोटाळा भंडारा

By

Published : Jun 18, 2020, 6:50 PM IST

भंडारा - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये कार्यरत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संगणक खरेदी करताना लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने 'गव्हर्मेंट मार्केट प्लस'च्या माध्यमातून हे संगणक खरेदीने न करता स्थानिक दुकानदाराकडून खरेदी करून स्वतः जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरवठा केला आहे. चौकशीमध्ये मुख्य लेखापाल यांनी यात आर्थिक अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे, असे अहवाल दिला आहे.

भंडारा जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाला जिल्ह्यातील 33 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी शासनाकडून 2018-19 मध्ये अनुदान प्राप्त झाले होते. वास्तविक जिल्हा स्तरावरून संगणक आणि प्रिंटर खरेदी प्रक्रिया गव्हर्मेंट ई- मार्केटप्लेस यावरून राबवून प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरवठा करणे आवश्यक होते. मात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तसे न करता त्या अनुदानाचे तुकडे पाडून कार्यालयीन आकस्मिक खर्च अंतर्गत संगणक या उपशीर्षक 16 लाख 50 हजार रुपये प्राथमिक आरोग्य केंद्रांना अनुदान वितरित केले. विशेष म्हणजे सदर अनुदान वितरित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मान्यता घेणे आवश्यक होते. परंतु तसे न करता ती थेट निधी प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आली.

संगणक आणि प्रिंटर खरेदीत आरोग्य अधिकाऱ्यांकडून घोटाळा झाल्याचा भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षांचा आरोप

हेही वाचा...बांधावर बियाणे पोहोचलेच नाही, दुकानातही तुटवडा; पाऊस पडूनही आम्ही पेरावं की नाही?

अनुदान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या खात्यात जमा झाले असले, तरिही संगणकाची खरेदी मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत जिल्हास्तरावरून करण्यात आली. जिल्ह्यातील ठराविक दुकानदाराकडून 34, 450 आणि 34,500 अशा किमती संगणक तर 14,440 आणि 15,500 प्रिंटर खरेदी करून प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरवण्यात आले. 16 लाख 50 हजार रुपये किमतीचे संगणक आणि प्रिंटर एकत्रित आणि एका दुकानातून खरेदी केले असते, तर त्यासाठी ई निविदा मागविणे गरजेचे झाले असते. त्यामुळे हा घोटाळा करण्यासाठी या अनुदानाचे तुकडे पाडून प्राथमिक आरोग्य केंद्रांना पहिले पैसे पुरवले गेले आणि नंतर स्वतः संगणक आणि प्रिंटर त्यांना पुरवठा करून तेच पैसे परत घेतले गेले. याविषयी चौकशी व्हावी आणि दोषी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची तात्काळ बदली करावी, असे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.

त्यानुसार मुख्य लेखापाल व वित्त अधिकारी यांनी याची चौकशी केली असता, या चालू प्रकारात आर्थिक अनियमितता झाल्याचे दिसून आल्याचा अहवाल त्यांनी सादर केला आहे. असे असतानाही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठीशी घालत असल्याने तेसुद्धा यातच सामील आहेत की काय? अशी शंका येत असल्याचे आरोप जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details