भंडारा- शहरातील नागरिकांना कोरोना आजाराचे गांभीर्यच नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही, व्यावसायिक वेळेवर दुकाने बंद करत नाही. सर्वांकडून नियम धाब्यावर बसवून काम केले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, अशा नागरिकांना चोप देण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी दररोज साडेपाच नंतर नगरपालिकेतील कर्मचारी आणि पोलिसांसह रस्त्यावर उतरून नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत मास्क न बांधने यासह इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ हजार ३०३ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, तसेच व्यावसायिकांना आर्थिक फटका बसू नये यासाठी तत्कालीन नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी दुकानदारांना सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी दिली होती. मात्र, दुकानदारांकडून या नियमाला केराची टोपली दाखवण्यात आली. नागरिकांकडूनही कोरोना नियंत्रणासंबंधी नियामांना बगल देण्यात आली. नागरिकांकडून मास्क न बांधने, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे या सारख्या आवश्यक गोष्टींची हेळसांड होत होती. परिणामी मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी शहरात गस्त घालून नियम मोडणाऱ्या नागरिक आणि व्यावसायिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. मात्र, या उपक्रमात मुख्याधिकारी स्वत: सहभागी होत नव्हते. गेल्या ३ महिन्यातील कारवाईत पालिकेने ८७ हजार रुपयांचा दंड वसून केला होता. त्यानंतर, महिन्याभरापूर्वी विनोद जाधव हे पालिकेच्या नव्या मुख्याधिकारीपदी विराजमान झाले.