भंडारा- गोंदिया लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडे चल आणि अचल संपत्ती कोट्यवधी रुपयांची आहे. तसेच भाजपच्या उमेदवाराच्या पत्नीकडेही कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे, त्यांनी सादर केलेल्या शपथ पत्रामध्ये माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे, कोणत्याही उमेदवारांवर कोणतेही गुन्हे नसल्याचे शपथपत्रामध्ये म्हटले आहे.
लोकसभा २०१९ च्या निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून सुनील मेंढे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी अभियांत्रिकी विभागातून शिक्षण घेतले आहे. त्यांनी भरलेल्या शपथ पत्रानुसार, २०१७- १८ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न १५ लाख ५६,००० एवढे आहे. २०१३ ते १४ मध्ये त्यांचे उत्पन्न ११ लाख ४१ हजार ९० एतके होते. म्हणजे मागील ५ वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या उत्पन्नात फक्त ४ लाख रुपये उत्पन्नाची वाढ झाली.
सुनील मेंढे यांच्याकडे चल संपत्ती यामध्ये नगदी रक्कम विविध बँकेतील जमा असलेले पैसे, कंपनी आणि फंडमध्ये गुंतवलेले पैसे, इन्शुरन्स पॉलिसीमध्ये गुंतवलेले पैसे, त्यांनी घेतलेल्या विविध गाड्या आणि त्यांच्याकडे असलेले २५० ग्रॅम सोने असे एकूण ३ कोटी ५७ लाख ५१ हजार ४९२ रुपयांची संपत्ती आहे. तर अचल संपत्तीमध्ये विविध ठिकाणी असलेले भूखंड फ्लॅट घर जमिनी कमर्शियल बिल्डींग अपार्टमेंट अशी एकूण ३९ कोटी १६ लक्ष ३५ हजार ५०० रुपये इतकी त्यांची संपत्ती आहे. मेंढे यांची चल आणि अचल अशी दोन्ही संपत्ती म्हणून ४२ कोटी ७३ लाख ८६ हजार ९९२ एवढी संपत्ती आहे. तर सुनील मेंढे यांच्यावर एसबीआय भंडारा आणि एसबीआय नागपूर या दोन्ही बँकेचे ४९ लाख ३ हजार इतके कर्ज आहे.
त्यांच्या पत्नीचे २०१७-१८ मध्ये वार्षिक उत्पन्न ७८ लाख ८४ हजार ४२४ इतके आहे. २०१३- १४ मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न ४ लाख ४७ हजार नऊशे दहा एवढे होते. म्हणजे मागील पाच वर्षाच्या कालावधीत सुनील मुंडे यांच्या पत्नीच्या वार्षिक उत्पन्नात तब्बल ७४ लाखांनी वाढ झालेली आहे. त्यांच्याकडे चल संपत्ती ही १ कोटी ४० लाख ३० हजार ४३३ तर अचल संपत्ती १८ कोटी ३१ लाख ११ हजार एवढी आहे. म्हणजे चल आणि अचल संपत्ती मिळवून त्यांच्याकडे १९ कोटी ७१ लाख ४१ हजार ४३३ इतकी संपत्ती आहे. तर त्यांच्यावर बँकेचे ११ लाख ५० हजार रुपयाचे कर्ज आहे.
राष्ट्रवादीतर्फे रिंगणात नाना पंचबुद्धे हे निवडणूक लढवत आहेत. ते शिक्षण हायर मेट्रीक ( पुर्वीची ११ वी ) पास आहेत. नाना पंचबुद्धे यांचे २०१८ - १९ मध्ये वार्षिक उत्पन्न होते ४७ लाख ९१ हजार २९९ रुपये होते. तर २०१४-१५ मध्ये ११ लाख २३ हजार ३३५ इतके वार्षिक उत्पन्न होते. म्हणजे मागील पाच वर्षात त्यांचे उत्पन्न ३६ लाख ६७ हजार ९४४ रुपयांनी वाढले आहे. त्यांच्याकडे चल संपत्ती यामध्ये नगदी रुपये बँकेतील जमा म्युच्युअल फंड विविध बॉन्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक सोन्याचे ३०० ग्रामचे दागिने अशी एकूण १ कोटी ४८ लाख २० हजार इतकी संपत्ती आहे. तर अचल संपत्ती यामध्ये विविध ठिकाणी असलेली शेत जमीन, वेगवेगळ्या ठिकाणी असलेले घर फ्लॅट्स असे एकूण ३ कोटी ७१ लाख ४० हजार इतकी संपत्ती आहे.
चल आणि अचल संपत्ती मिळून ५ कोटी १९ लाख ६० हजार रुपये एवढी एकूण संपत्ती आहे. त्यांच्यावर भंडारा महिला नागरिक पतसंस्थेचे २० लाख ५० हजार १३४ रुपयांचे कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नीकडे चल संपत्ती २० लाख २ हजार ५२० एवढी असून अचल संपत्ती ३५ लाख इतकी आहे. चल आणि अचल संपत्ती मिळून एकूण ५५ लाख एवढी संपत्ती त्यांच्याकडे आहे. दोन्ही मुख्य पक्ष व्यतिरिक्त इतरही पक्षाच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती ही काही लाखाच्या घरात आहे.