भंडारा - 'भाताचा जिल्हा' म्हणुन प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते असलेल्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने तांदूळ आणि धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. कृषी विभागाने महोत्सवासाठी निधी नसल्याचे सांगितल्यामुळे या शेतकऱ्यांना हे पाऊल उचलावे लागले. 'सुरगंगा तांदूळ व धान्य कृषी महोत्सव' असे या महोत्सवाचे नाव आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात, १० ते १५ जानेवारीदरम्यान हा महोत्सव असणार आहे.
जिल्ह्यातील अकरा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हा तांदूळ महोत्सव सुरू केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना सेंद्रिय तांदूळ कमी किंमतीत मिळावा, तसेच शेतकऱ्यांचा तांदूळ मध्यस्थ व्यापाऱ्याजवळ न जाता, थेट ग्राहकांना मिळावा या उद्देशाने हे शेतकरी एकत्रित आले आहे. या तांदूळ महोत्सवात सेंद्रिय शेतीत पिकवलेल्या काळा तांदूळ, ब्राउन राईस, केसर, शुगर-फ्री राईस, जय श्रीराम, आंबेमोहर आणि सुगंधित चिन्ह यांसारख्या विविध प्रजातींचे तांदूळ एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहक सुद्धा आनंदित आहेत.