भंडारा- मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी ३ ऑगस्ट रोजी भंडाऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुल येथे मोठा मंडप उभारण्यात आला होता. यामुळे क्रीडांगणाची दुरावस्था झाली आहे. या दुरावस्थेमुळे ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धाही रद्द झाल्या आहेत. आज दहा दिवस उलटूनही या क्रीडांगणाकडे कोणीही पाहत नाही.
महाजनादेशाचा फटका, भंडारा जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेसाठी छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर एक मोठा मंडप उभारण्यात आला होता. त्यासाठी ट्रकमधून माध्यमातून मैदानावर सामान पोहोचवण्यात आले. त्यामुळे क्रीडांगणावर मोठमोठे लांब खड्डे पडलेले आहेत. २ तारखे दरम्यान पाऊस येत असल्यामुळे झालेला चिखल निस्तरण्यासाठी मैदानाच्या मधल्या भागात मोठ्या प्रमाणात वाळू टाकण्यात आली होती. तर सभा स्थळापर्यंत जाण्यासाठी वाळू आणि गिट्टीचा एक कच्चा रस्ता बनविण्यात आला होता. ३ तारखेला ही सभा तर संपली. मात्र, त्यानंतर मैदानाची जी दुरवस्था झाली होती ती आजही तशीच आहे. इथे सर्वत्र वाळू पसरलेली आहे. धावण्याच्या ट्रॅकवर गिट्टी आणि वाळूचे थर साचलेले आहेत. त्यामुळे मैदानावर सराव करणाऱ्या हॉकीच्या खेळाडूंना मैदानाच्या एका छोट्या कोपऱ्यात सराव करावा लागत आहे. ट्रॅकवर धावण्यासाठी अडचण निर्माण होत असलेल्या गिट्टी आणि वाळूच्या ढीग एका बाजूला सारून एक छोटासा ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मात्र, यावरून धावण्यासाठी खूप त्रास होत असून इथे धावताना धावपटूंच्या पायांना इजा होऊ शकते.
पुढच्या महिन्यात चंद्रपूरला आर्मीची भरती असल्याने युवक धावण्याचा सराव करण्यासाठी येथे येत आहेत. मात्र, त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याविषयीची त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार दिली तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनाही तक्रार दिली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. भाजप सरकारने एखादे चांगले काम केले तर हे कार्यकर्ते जल्लोष करतात. मग त्यांच्या महाजनादेश यात्रेनंतर क्रीडांगणाची दुरावयस्था झाली आहे. त्याची जबाबदारी घेऊन क्रीडांगण अधिकाऱ्यांच्या मागे लागून व्यवस्थित का करीत नाही, आपल्या स्वार्थासाठी हे आमचा नुकसान कसे करू शकतात असा संतप्त सवाल या युवकांनी उपस्थित केला आहे.
महाजनादेशाचा फटका शालेय विद्यार्थ्यांनाही बसला आहे कारण याच क्रीडा संकलनात ५ ऑगस्टपासून फुटबॉलच्या जिल्हास्तरीय स्पर्धा होत्या. मात्र, क्रीडांगण पूर्णपणे खराब झाल्याने या स्पर्धा रद्द करण्यात आल्या. या महाजनादेशासाठी इतरही ठिकाण उपलब्ध असताना याच क्रीडांगणावर सहभाग का ठेवण्यात आली हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
सभेनंतर क्रीडांगण सुव्यवस्थित करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाला होती. मात्र, अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच भाजपच्या लोकांनाही आता या क्रिडांगणाला पूर्ववत करण्याची जवाबदारी राहिलेली नाही असेच दिसत आहे. या प्रशासकीय अधिकारी आणि भाजपच्या लोकांनी क्रीडा क्षेत्राच्या विद्यार्थ्यांचा जो नुकसान केला आहे तो कधीही भरून काढता येणार नाही. क्रीडांगण कधी दुरूस्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.