भंडारा - 6 ऑगष्ट हा दिवस भंडारा जिल्ह्यासाठी दिलासा देणारा ठरला. तब्बल दीड वर्षानंतर शुक्रवारी भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. शुक्रवारी शासकीय आकडे आल्यावर जिल्ह्यातील एकमेव कोरोनाग्रस्त रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे समोर आले. जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला. प्रशासनाने राबवलेल्या चारसूत्री धोरणामुळे जिल्हा कोरोनामुक्त झाला, याचे श्रेय सर्व स्तरावरील यंत्रणेला असल्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले आहे.
संदीप कदम - जिल्हाधिकारी, भंडारा - 24 एप्रिल 2020 मध्ये पहिला रुग्ण -
भंडारा जिल्ह्यात 24 एप्रिल 2020 मध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढली होती. नंतर ऑक्टोबर 2020 मध्ये रुग्ण संख्या आटोक्यात आली. मात्र, रुग्ण संख्या पूर्णपणे थांबली नाही. फेब्रुवारी 2021 नंतर संथगतीने सुरू असलेली रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली.
हेही वाचा -राज्यात पुणे, सांगली, सातारा, अहमदनगरमध्ये सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण
- एप्रिल 2021 मध्ये एकाच दिवशी 1600 रुग्ण -
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात एकाच दिवशी तब्बल 1600 कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाची तारांबळ उडाली. रुग्ण संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. नागरिकांना बेड आणि ऑक्सिजन मिळणे कठीण झाले होते.
रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी चारसूत्री योजना राबविली. संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टेस्टिंग कॅम्प लावले. दिवसाला 9 हजारपर्यंत कोरोना टेस्टिंग केल्या. त्यामुळे कोरोना रुग्ण शोधून काढण्यात यश आले. या सर्व रुग्णांना योग्य उपचार मिळावा यासाठी प्रयत्न केले गेले, या साठी बेड वाढवले. ऑक्सिजन सिलेंडर वाढवले तर जे रुग्ण घरी राहून उपचार घेत होते त्यांच्यासाठी छोटे कंटेन्मेंट झोन, एकापेक्षा जास्त लोक असल्यास मोठे कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आणि या रुग्णांशी संबंधित लोकांची ट्रेसिंग करून त्यांच्या चाचण्या करण्यावर भर दिला.
या सर्व गोष्टींची फलश्रुती म्हणजे आज जिल्हा कोरोनामुक्त झाला असून, याचे श्रेय हे आरोग्य, महसूल, पोलीस, नगर पालिका या सर्व लोकांचे असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या पुढेही अशाच पद्धतीने आम्ही काम करून कोरोनाला रोखू, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
हेही वाचा -कोव्हिशिल्ड घेऊन परेदशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 कोटीचा निधी; असा करा अर्ज