भंडारा - तालुक्यातील अनाथ आश्रमात राहणाऱ्या 21 मुलांची यावर्षीची दिवाळी त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस ठरला. अनाथ म्हणून जीवन जगणाऱ्या या मुलांना भाऊबीजेच्या दिवशी "नाथ" मिळाला. गोडाचे जेवण, भेटवस्तू, फटाक्यांची आतिषबाजी, सांस्कृतिक कलागुणांचे झालेले सादरीकरण, शेवटी एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे प्रत्येकाची केलेली आस्थेने विचारपूस आणि शेवटी मी आहे घाबरू नका, अशा दिलेल्या धीरामुळे माता-पित्याचे छत्र नसलेल्या त्या अनाथांच्या दिवाळीत खऱ्या अर्थाने रंग भरून गेला. तर या अनाथांचे नाथ भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम हे बनले होते.
मुलांसोबत रमले जिल्हाधिकारी -
कुणी नको होती म्हणून तर कुणी परिस्थितीची शिकार म्हणून अनाथालयात आले. चार पैशासाठी पोरांना भीक मागण्यास भाग पाडणारे आई-वडीलही अनेकांच्या अनाथ होण्याचे कारण ठरले. अशा अनेक अनाथांचे वास्तव्य असलेल्या भंडारा तालुक्यातील आमगाव येथील अनाथालयातील मुलामुलींची दिवाळी यावर्षी खऱ्या अर्थाने विविध रंगांनी भरुन गेली. दिवाळी येते आणि जाते. प्रत्येक घरात आनंदी-आनंद असतो. मात्र, या अनाथांच्या कुटुंबातील वास्तविकता काही वेगळीच असते. हे वातावरण बदलण्याचे काम जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. ते स्वतः आमगाव येथे अनाथांच्या कुटुंबात दाखल झाले.
10 ते 20 वर्ष वयोगटातील 21 मुलांसोबत त्यांनी दिवाळी साजरा केली. तसेच प्रत्येकाला भेटवस्तू, गोडाधोडाचे जेवणही दिले. पालक या नात्याने प्रत्येक मुला-मुली मारलेल्या वैयक्तिक गप्पा, त्यातून प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्याचे निश्चित केलेले ध्येय आणि त्याच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासक असा दिलेला शब्द, अशा वातावरणात तीन तास कसे निघून गेले हे कळलेच नाही.