महाराष्ट्र

maharashtra

केंद्रीय पथकाच्या पाहणीवर पूरग्रस्त भागातील नागरिकांची नाराजी

By

Published : Dec 24, 2020, 8:57 PM IST

जिल्ह्यात पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला ही नेमकी पाहणी कशासाठी याविषयी विचारले असता, या पथकातील सदस्यांनी याविषयी बोलण्यास टाळले. त्यामुळे या पथकाने नेमके नागरिकांना सांगायचे तरी काय होते आणि पाहणी ही नेमकी कशाची होती? हे स्पष्टपणे समजू शकले नाही.

भंडारा
भंडारा

भंडारा- जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी केंद्रीय पथक दुसऱ्यांदा आले होते. मात्र, पहिल्या पथकाच्या पाहणीनंतरही लोकांना हवी ती मदत मिळाली नाही आणि आता चार महिन्यानंतर पुरामुळे नुकसान केंद्रीय पथक कुठून शोधून काढेल. केंद्रीय पथकाची ही पाहणी नसून फेरफटका आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

भंडारा

चार ठिकाणी केली धावती पाहणी
ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे भंडारा जिल्ह्यातील शेती आणि घरांचे अतोनात नुकसान झाले. या महापुराच्या जवळपास वीस दिवसांनंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी पथक आले होते. या पथकाने दिलेल्या अहवालानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. अंशता बाधित लोकांना 16,000 तर पूर्णतः बाधित लोकांना 95 हजार रुपये देण्यात आले. राज्य शासनाने दिलेल्या साठ टक्के अनुदानामधून ही रक्कम देण्यात आली. उरलेल्या 40 टक्के रक्कम देण्यासाठी पुन्हा केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यात दाखल झाले. सुरुवातीला या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती भंडारा येथे जाऊन विक्रीसाठी आलेल्या धान्याची पाहणी केली. त्यानंतर हे पथक पिंडकेपार या नुकसानग्रस्त गावात पोहोचले. तिथे नागरिकांशी चर्चा करून घर आणि शेतीची धावती पाहणी केली आणि हा केंद्रीय पथकाचा ताफा पुढच्या पाहणीसाठी पवनी तालुक्याच्या दिशेने निघून गेला.
नागरिकांचा प्रश्न
चार महिन्याअगोदर पूर आला. या महापुरात लोकांचे घर पडले, घरातील संपूर्ण साहित्य खराब झाले. शेतीचे मोठे नुकसान झाले. मात्र, त्यानंतरही नागरिकांनी स्वतःला सावरत जमेल त्या पद्धतीने टिनाचे शेड लावून घर उभे केले. शेती पुरामुळे खराब झाली त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही शेती पडीत ठेवलेली आहे. आता जीवन जेव्हा पूर्ववत होत आहे, अशा वेळेस एक केंद्रीय पथक आमच्या गावात येऊन काय शोधतो आहे? हा प्रश्नच आहे. त्यामुळे हे पथक नेमके कशा पद्धतीचे नुकसान त्यांच्या अहवालात दाखवेल हा मोठा प्रश्न आहे. हे पथक पाहण्यासाठी नाही तर निव्वळ फेरफटका मारण्यासाठी आले असल्याची संतप्त प्रतिक्रिया पूरग्रस्त नागरिकांनी दिली आहे.
पाहणीविषयी केंद्रीय पथकाने बाळगले मौन
जिल्ह्यात पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला ही नेमकी पाहणी कशासाठी याविषयी विचारले असता, या पथकातील सदस्यांनी याविषयी बोलण्यास टाळले. त्यामुळे या पथकाने नेमके नागरिकांना सांगायचे तरी काय होते आणि पाहणी ही नेमकी कशाची होती? हे स्पष्टपणे समजू शकले नाही. पुरामुळे झालेल्या अंशतः बाधीत आणि पूर्णतः बांधीत लोकांची यादी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि गावकरी यांच्या मदतीने तयार करून ती यादी तहसील कार्यालयापर्यंत पोचविण्यात आली. मात्र, अधिकाऱ्यांनी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही अशा पद्धतीचे काम करीत जे लोक अंशता बाधित होते त्यांनाही पूर्णतः बाधित दाखवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप पिंडकेपार येथील नागरिक करीत आहेत. या पथकातर्फे आम्हाला कोणत्याही अपेक्षा नाहीत. यापेक्षा जो भ्रष्टाचार झाला आहे, त्याची चौकशी करून लोकांना त्यांचा न्याय हक्क मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details