भंडारा -नगरपरिषदेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवक नितीन धकाते यांनी नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप लावले. तसेच मेंढेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत त्यांना घरचा आहेर दिला आहे. तर, नगरसेवकाने लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. या नगरसेवकाने स्वतःच भरपूर आर्थिक घोटाळे केले आणि त्यामुळे त्यांना नुकतीच तुरुंगवारी करावी लागली असल्याचे नगराध्यक्ष आणि खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले. यासोबतच या नगरसेवकाने पक्षाचे व्हिपसुद्धा नाकारले असल्याने त्यांच्यावर पक्षांतर्गत ही कारवाई केली जाईल. त्यांना वेगळ्या पक्षात जायचे असल्याने ते लोकांची सहानभूती मिळवण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप करत असल्याचे नगराध्यक्ष मेंढे यांनी सांगितले.
मागील ३ वर्षाअगोदर पहिल्यांदाच भंडारा नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता स्थापन झाली आणि नगराध्यक्ष म्हणून भाजपचे सुनील मेंढे निवडून आले. तर, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हे नगराध्यक्ष भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार म्हणूनही निवडून आले. ते खासदार झाल्यानंतर नगराध्यक्षपदाचा राजीनामा देतील, असे नगरसेवकांना वाटत होते. मात्र, नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्याने भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली. त्याचाच परिणाम ८ दिवसांपूर्वी झालेल्या उपाध्यक्षपद आणि सभापतीच्या निवडणुकीत दिसून आला.
भाजपची सत्ता असतानाही अपक्ष असलेल्या दिनेश भुरे यांना उपाध्यक्ष बनण्यासाठी समर्थन द्यावे लागले. तर, सभापतीच्या निवडणुकीत भाजपच्या २ आणि भाजप समर्थित १ अपक्ष अशा ३ लोकांनी बंडखोरी केल्याने भाजपच्या २ सभापतींना पराभवाचे तोंड पाहावे लागले. मात्र, हे प्रकरण इथेच थांबले नाही तर भाजपचे बंडखोर नगरसेवक नितीन धकाते यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यात नगराध्यक्ष आणि खासदार असलेल्या मेंढे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करीत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी धकातेंनी केली. मेंढे यांनी आपल्या भाच्याच्या नावाने स्वतःचे कामाचे बिल काढले तसेच पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन मध्येही त्यांनी भ्रष्टाचार केला असा आरोप धकाते यांनी केला. तसेच मी भाजपच्या विरोधात नाही तर नगराध्यक्षांच्या कामाच्या विरोधात असल्याचे धकातेंनी यावेळी सांगितले.