भंडारा : तुमसर तालुक्यातील येरली येथील खासगी आदिवासी आश्रमशाळेतील ४१ विद्यार्थांना अन्नातून विषबाधा झालीय. एवढ्या मोठ्या संख्येनं एकाचवेळी उपचार करणे तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात शक्य नसल्यानं २३ विद्यार्थांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात १८ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. यासर्व ४१ विद्यार्थ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
४१ विद्यार्थ्यांना विषबाधा :गुरुवारी नेहमीप्रमाणे दुपारी साडेबाराच्या दरम्यान या विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आलं. जेवणानंतर दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान या विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलटी भोवळ येण्याचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला एक दोन विद्यार्थ्यांना हा त्रास जाणवू लागला. मात्र एकानंतर एका विद्यार्थाला उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. विद्यार्थ्यांची संख्या अचानक वाढू लागल्यानं शिक्षकांनी येरली येथील एका डॉक्टरला बोलवले. मात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढत राहिल्याने शेवटी या विद्यार्थांना तुमसर येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरुवातीला २४ विद्यार्थ्यांना जिल्हा उप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र रात्रीपर्यंत ही संख्या ३६ पर्यंत पोहोचली. त्यानंतर आणखी ५ विद्यार्थांना उशिरा रात्री भरती करण्यात आलं. विद्यार्थ्यांची संख्या वाढून ४१ वर पोहोचली. उपजिल्हा रुग्णालयात एवढ्या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार करणं शक्य नसल्यानं या विद्यार्थ्यापैकी २३ विद्यार्थांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं. तर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात १८ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आलं.