भंडारा -जिल्ह्याच्या कारधा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलगाव या ठिकाणी पोलीस चौकी जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित म्हणून चौकी शेजारी शेत असलेल्या एका शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान वाळूमाफियांच्या सांगण्यावरून माझ्या वडिलांना फसवले जात असल्याचा आरोप या शेतकऱ्याच्या मुलाने केला आहे.
वाळू तस्करी थांबवण्यासाठी पोलीस चौकीची निर्मिती
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या वाळूला महाराष्ट्रामध्ये मोठी मागणी आहे. त्यातच मागच्या वर्षभरात वाळू घाटाचे लिलाव झाले नाही. याचाच फायदा घेत या परिसरातून मोठ्य प्रमाणात वाळूची तस्करी सुरू आहे. भंडारा तालुक्यातील खमारी, मांडवी, बेलगाव या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्याने, वाळू तस्करांना लगाम घालण्यासाठी या पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली होती.
चौकी फक्त नावालाच
वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी चौकी उभारण्यात आली होती. मात्र ही चौकी केवळ नावालाच होती. याठीकाणी चौकी असताना देखील दररोज मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने वाळूची तस्करी होत आहे. मात्र तरी देखील पोलीस कारवाई करत नव्हते, तसेच रात्रीच्या वेळी या चौकीवर एकही पोलीस हजर राहत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान चौकीत पोलीस नसल्यामुळे ही चौकी जाळण्यात आली. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रमस्थांनी केली आहे.
पहाटेच्या सुमारास जाळली चौकी
सकाळी पहाटे चार वाजेच्या दरम्यान या चौकीला कोणी तरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची माहिती पुढे आली आहे. ही चौकी पूर्णपणे जळली असून, केवळ लोखंडी पलंग तिथे उरलेले आहेत. ही चौकी ज्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या बाजूला होती, त्यांनीच ती जाळली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अज्ञात व्यक्तीने जाळली पोलीस चौकी वाळू माफियांना वाचवण्यासाठी माझ्या वडिलांवर आरोप
या ठिकाणावरून होणाऱ्या वाळू तस्करीला माझे वडील नेहमी विरोध करायचे. त्यामुळे बऱ्याचवेळा वाळू माफियांसोबत त्यांचे वाद व्हायचे, बेलगाव, मांडवी आणि खमारी या तीन गावातील वाळू माफियांचे आपसात वाद आहेत, याच वादातून ही चौकी जाळण्यात आली. मात्र याप्रकरणी पोलीस चुकीच्या पद्धतीने माझ्या वडिलांवर गुन्हा दाखल करून पाहत आहेत, असा आरोप या शेतकऱ्याच्या मुलाने केला आहे. दरम्यान याबाबत पोलिसांना विचारले असता, सध्या चौकशी सुरू असून, या प्रकरणावर भाष्य करता येणार नाही, तपास पूर्ण झाल्यावर बोलू असे सांगण्यात आले.