भंडारा -जिल्ह्यात 15 जानेवारीला होणाऱ्या 148 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलीस विभागातील कर्मचारीही त्यांच्या मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. 15 जानेवारीला सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर 18 तारखेला मतमोजणी होणार आहे.
148 ग्रामपंचायतीत निवडणूक
राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर रोजी निवडणुकीची घोषणा केली होती. जिल्ह्यात 148 ग्रामपंचायतीची निवडणूक घोषित करण्यात आली होती. यात साकोली तालुक्यातील 18, मोहाडी तालुक्यातील 17, भंडारा तालुक्यातील 35, पवनी तालुक्यातील 27, लाखनी तालुक्यातील 20, साकोली तालुक्यातील 20, तसेच लाखांदूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 461 प्रभागातून 1236 सदस्य निवडणूक द्यायचे आहेत. त्यासाठी 2745 उमेदवार सध्या रिंगणात आहेत.
468 मतदान केंद्र
15 जानेवारीला होणाऱ्या 148 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 468 मतदानकेंद्र तयार करण्यात आली असून यामध्ये तुमसर तालुक्यात 59 मतदान केंद्र, मोहाडी तालुक्यात 52, भंडारा तालुक्यात 111, पवनी तालुक्यात 82, साकोली तालुक्यात 61, लाखनी तालुक्यातील 68 आणि लाखांदूर तालुक्यात 35 मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहेत. या मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत चालावे म्हणून 526 केंद्रप्रमुख, 1578 मतदान अधिकारी, 481 वर्ग चार चे कर्मचारी आणि 512 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सात तालुक्यातील तहसील कार्यालयातून रवानगी
भंडारा जिल्ह्याच्या सातही तालुक्यात गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयात हे सर्व कर्मचारी आणि अधिकारी जमले होते. याठिकाणी कर्मचाऱ्यांची त्यांच्या मतदान केंद्रांवर नोंदणी करून सर्व साहित्य वाटप करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी बसून साहित्य योग्य काम करते, की नाही त्याची तपासणी केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या साहित्यामध्ये या वर्षी एक नवीन गोष्ट निदर्शनास आली आणि ती म्हणजे मास्क आणि हॅन्डग्लोव्ह्स. कोरोना असल्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी या दृष्टीने निवडणूक आयोगाने मास्क आणि हॅन्डग्लोव्ह्स दिले आहेत. मात्र तहसील कार्यालयात जमलेल्या कर्मचाऱ्यांपैकी बरेच कर्मचारी हे विनामास्क दिसले. या सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांना त्यांच्या मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी खासगी शाळेतील स्कूल बसचे नियोजन करण्यात आले होते.