महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाचव्या बाळासह आई-वडील होण्याचे स्वप्नही संपले, मातेचा टाहो

साकोली तालुक्याच्या उसगाव येथील हिरकण्या व हिरालाल भानारकर या दाम्पत्याच्या चार बाळांचा विविध कारणाने मृत्यू झाला आहे. लक्ष्मीच्या रुपाने पाचवे बाळ जगात आले. मात्र, भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या अग्नीकांडामध्ये तेही दगावले. आता हिरकण्या आई होऊ शकणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे आम्हाला पाच लाख नको बाळ हवे, अशी मागणी भानारकर दाम्पत्याने केली आहे.

भानारकर दाम्पत्य
भानारकर दाम्पत्य

By

Published : Jan 11, 2021, 4:53 PM IST

Updated : Jan 11, 2021, 5:28 PM IST

भंडारा -आपण आई-वडील व्हावे हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न असते. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील उसगाव या गावात राहणारे भानारकर दाम्पत्य मागील 14 वर्षांपासून हे स्वप्न उराशी बाळगत आहेत. पूर्वी त्यांच्या चार बाळांचा मृत्यू झाला होता. सहा जानेवारीला त्यांच्या आयुष्यात पाचव्या बळाने प्रवेश केला. मात्र, शनिवारी (दि. 9 जाने.) मध्यरात्री दोन वाजता झालेल्या जळीत अग्निकांडामध्ये त्यांचा हा पाचव्या बाळाचाही मृत्यू झाल्याने या दाम्पत्यावर आभाळ कोसळले आहे.

मृत बाळाच्या आई-वडिलाशी बातचीत करताना प्रतिनिधी

14 वर्षांत 5 बाळांचा मृत्यू

शनिवारी (दि.9जाने.) मध्यरात्री झालेल्या जळीत कांडामध्ये भंडारा जिल्ह्यातील दहा जन्मजात बालकांचा मृत्यू झाला. या दुर्देवी पालकांमध्ये साकोली तालुक्याच्या उसगाव येथील भानारकर दाम्पत्याचाही समावेश आहे. हिरालाल भानारकर यांचे 2006 मध्ये हिरकण्या भानारकर हिच्याशी लग्न झाले. 2007 मध्ये त्यांच्या आयुष्यात पहिली आनंदाची बातमी आली. मात्र, अवघ्या पाच महिन्यांमध्ये त्यांचा गर्भपात झाला. त्यानंतर 2009 मध्ये केवळ सहा महिन्यात त्यांचा गर्भपात झाला. 2011 मध्येही सहाव्या महिन्यात त्यांचा गर्भपात झाला. 2013 मध्ये त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र, जन्माच्या एका तासातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर 6 जानेवारी, 2021 मध्ये त्यांना पाचवे आपत्य लक्ष्मीच्या रुपाने आले. त्या मुलीचा वजन कमी असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयातील एसएनआयसी सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. शनिवारी मध्यरात्री झालेल्या जळीतकांडामध्ये त्यांचे हा पाचवे बाळही दगावले.

बाळ दगावले मध्यरात्री माहिती मिळाली सकाळी

चार बाळांच्या मृत्यूनंतर हिरकण्याची शारीरिक परिस्थिती खालावली होती. तरीही त्यांनी पाचवे बाळ ठेवण्याचे धाडस केले होते. त्यासाठी त्यांनी मजुरी करत त्यांनी खासगी रुग्णालयातून उपचारही सुरू केले होते. उपचारानंतर पाचवे बाळ जगात आले. घटनेच्या दिवशी सकाळी नऊ वाजता त्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती भानारकर दाम्पत्याला मिळाली. घटना मध्यरात्री घडली मात्र माहिती सकाळी नऊ वाजता रुग्णालयाकडून देण्यात आली. तोपर्यंत बाळ सुरक्षित असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितल्या आरोप दाम्पत्याने केला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बाळ हिरावल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा -भंडारा रूग्णालयातील बालकांच्या मृत्यूनंतर राजकारण: भाजपातर्फे भंडारा बंदची हाक

हेही वाचा -भंडारा रुग्णालयातील थरार; स्वतःचा जीव धोक्यात घालून 'त्यांनी' वाचवले सात जीव

Last Updated : Jan 11, 2021, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details