भंडारा - लॉकडाऊनचा फायदा उचलत एका बार मालकाने स्वत: च्याच मालकीचा बार फोडून तब्बल ९ लक्ष रुपयाचा दारुसाठा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची डिव्हिआर चोरुन नेल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात उघडकीस आली. अंगलट येऊ नये, या हेतूने खुद्द बार मालकानेच पोलीस ठाण्यात बारमध्ये चोरी झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शिताफीने तपास केल्यावर तक्रारदारच आरोपी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
लॉकडाऊनमुळे तालुक्यात मद्यपिंची दारुची वाढती मागणी लक्षात घेऊन दुप्पट आणि तिप्पट किंमतीने विदेशी दारूची होणारी विक्री होत असल्याचे पाहून संबंधित आरोपीने स्वत: च्या मालकीचे बार फोडून पोलिसांपुढे अज्ञात आरोपीचा बनाव केला होता. यापूर्वीदेखील संबंधित बारला बेकायदेशीर आणि शासन नियमाचे उल्लंघनप्रकरणी जवळपास दोनदा टाळेबंद करण्यात आले होते. मात्र, लाखांदूर पोलिसांच्या समयसुचकता आणि तपासामुळे आरोपीचा बनाव अवघ्या दोन दिवसात उघड होऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात कलम ४५४, ४५७ आणि ३८० भादंवि अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.