भंडारा -शासनाने बंदी घातलेल्या थायलंड मागूरची(माशाचा प्रकार) निर्मिती करणाऱ्या रॅकेटवर मत्स्य विभाग, महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. उत्पादन होत असलेले सर्व मासे एकत्र करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यामुळे थायलंड मागूरचे उत्पादन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मागूर उत्पादकांवर भंडाऱ्यात कारवाई
थायलंड मागूर हा आरोग्यासाठी धोकादायक आहे, असे संशोधनात समोर आले. त्यामुळे शासनाने 2019 मध्ये थायलंड मागूरच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी आणली. तरी काही ठिकाणी या माशांचे उत्पादन आणि विक्री सुरू होती. मत्स्य विभागाने जाख येथे सुरू असलेल्या मागूर उत्पादनावर धाड टाकली. जाख हे गाव गोसे प्रकल्पबाधित असल्याने त्याचे पुनर्वसन इतर ठिकाणी झाले आहे. त्यामुळे या परिसरात कोणीही राहत नाही. आंध्र प्रदेशातील दहा ते बारा कुटुंबांनी आपले बस्तान या ठिकाणी टाकले आहे.
हेही वाचा - ...म्हणून आज, उद्या बँका राहणार बंद
बुडीत शेतीत छोटे-छोटे तलाव तयार करून मागील पाच ते सहा वर्षांपासून यात थायलंड मागूरचे उत्पादन सुरू केले. वर्षभरापूर्वी थायलंड मागूरवर बंदी आल्यानंतर ही उत्पादने बंद करावी, अशी नोटीस दोन महिने अगोदर या लोकांना दिली गेली. मात्र त्यांनी या नोटीसला गांभीर्याने न घेता उत्पादन सुरू ठेवले. त्यामुळे प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली.
या थायलंड मागूरला दिले जाणारे खाद्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असते. यामध्ये खराब झालेली अंडी, मृत पावलेली जनावरे खाद्य म्हणून दिले जाते. त्यामुळे हे मासे पर्यावरणाला तसेच मनुष्याच्या आरोग्याला ही धोकादायक आहेत. हे मासे खाल्ल्यामुळे कॅन्सर सारखा रोग होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने या माशांवर बंदी घातली आहे.
हे मासे एक दीड महिन्यातच विक्री योग्य होतात. थायलंड मागूरचा दर हा देसी मागूर पेक्षा खूप कमी आहे त्यामुळे बाजारात या थायलंड मागूरची मागणी जास्त आहे. त्यामुळे स्थानिक मत्स्यव्यवसाय करणाऱ्या ढिवर बांधवांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. प्रशासनाने केलेल्या संयुक्त कारवाईत विविध गावातील ढिवर बांधवांनी एकत्र येऊन सर्व मागूर मासे बाहेर काढले. त्यानंतर एका खड्ड्यात मीठ टाकून हे मासे जमिनीखाली पुरण्यात आले.