भंडारा - सध्या तुमसर विधानसभा क्षेत्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. या मतदारसंघातील उमेदवारांनी गावोगावी जाऊन कॉर्नर सभा घेत प्रचाराची गती वाढवली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. गुरुवारी भाजपचे वरिष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान सभापती तारीक कुरेशी यांनी भाजपला रामराम ठोकला. तर, विद्यमान आमदार चरण वाघमारे यांनी केलेला बंडखोरीमुळे त्यांना त्यांच्या 4 सहकाऱ्यांसह पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमध्ये असलेल्या अंतर्गत वादाचा राष्ट्रवादीला फायदा होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.
तुमसर विधानसभा क्षेत्रात एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी ५ पक्षाचे तर ५ अपक्ष उमेदवार आहेत. रिंगणात जरी १० उमेदवार असले तरी खरी लढत ही भाजपचे प्रदीप पडोळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे आणि भाजपचे निलंबित बंडखोर आमदार व अपक्ष उमेदवार चरण वाघमारे यांच्यात असल्याने या विधानसभा क्षेत्रात त्रिशंकू लढत पाहायला मिळणार आहे. तुमसर मतदारसंघात 8 तारखेपासून प्रचाराला सुरुवात झाली असली तरी कोणत्याही पक्षाचा राष्ट्रीय स्टार प्रचारक आला नसल्याने सध्या उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहे. असे असले तरी राष्ट्रवादीतर्फे प्रफुल्ल पटेल हे उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. तर, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रचारप्रमुख नाना पटोले सध्या त्यांच्या विधानसभा क्षेत्रात स्वतःचा प्रचार करत असून १२ तारखेनंतर ते इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर भ्रमण करणार आहेत. या क्षेत्रात कुणबी, तेली, पवार आणि त्यानंतर अनुसूचित जाती या मतदारांची संख्या मोठी आहे. तर, प्रमुख लढत असलेले तिन्ही उमेदवार हे तेली समाजाचे आहेत. त्यामुळे कुणबी समाजाचे आणि पवार समाजाचे मतदान ज्या उमेदवाराच्या बाजूने पडतील त्याची विजयाची शक्यता तेवढीच वाढेल.