भंडारा- सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, शेतकरी आत्महत्या याविषयी न बोलता भाजप सरकार फक्त कलम 370 विषयी बोलत आहे. त्यामुळे या सरकारला 21 तारखेला चांगला धडा शिकवण्याची गरज आहे, ही दिवाळी राष्ट्रवादी काँग्रेसची असेल आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी-काँग्रेसचे 100 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू कारेमोरे यांच्या प्रचारासाठी भंडाऱ्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
'विद्यमान आमदार चरण वाघमारे यांनी मागील 5 वर्षात पेचचे पाणी पळवले. तो आमच्या आई-बहिणींचा विनयभंग करतो,' असे गंभीर आरोप मिटकरी यांनी केले. 'आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर त्या आत्महत्येसाठी जबाबदार म्हणून मुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे देवेंद्र फडणवीस ओरडून ओरडून सांगत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या 5 वर्षाच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते याविषयी एक शब्दही काढत नाहीत,' असे मिटकरी यांनी सांगितले.