भंडारा- भाजप सरकारने 2014 मध्ये शिवरायांच्या नावाने मते मागितली. त्याच सरकारने शिवरायांचे गड किल्ले भाड्याने देण्याचा निर्लज्जपणा दाखविला. अशा बेशरम सरकारला त्यांची जागा दाखविण्याची हीच खरी वेळ असून जोपर्यंत गड-किल्ल्यांविषयी घेतलेला निर्णय मागे घेतल्याचा अध्यादेश सरकार काढणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील शिवस्वराज्य यात्रा भंडाऱ्याच्या मुस्लिम लायब्ररी सभागृहात पोहोचली असताना लोकांना संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
हेही वाचा -आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस,राष्ट्रवादी बाजी मारेल - प्रफुल्ल पटेल
शिवरायांच्या स्वप्नातला खरा महाराष्ट्र लोकांना मिळवून देण्यासाठी आणि भाजप विरुद्ध लोकांच्या मनात असलेली खदखद बाहेर काढून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता उलथून पाडण्यासाठी शिव स्वराज्य यात्रा काढली असल्याचे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. येत्या विधानसभेमध्ये भाजपची सत्ता उलथून पाडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी जमलेल्या लोकांना केले.