भंडारा - सोमवारपासून (7 जून) भंडारा जिल्ह्यात बाजारपेठा दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. लग्न समारोहामध्ये केवळ 50, तर अंत्यविधीच्या कार्यक्रमात केवळ 20 लोकांना परवानगी राहणार आहे. सिनेमागृह मात्र अजूनही बंद राहणार आहेत. भंडारा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी 7.67 टक्के असल्याने जिल्ह्याला अंशतः लॉकडाऊन राहणार आहे. शनिवारी (5 जून) भंडारा जिल्ह्यात 33 कोरोना रुग्ण आढळून आले, तर 228 रुग्ण बरे झाले.
905 पैकी केवळ 73 बेडवर रुग्ण
भंडारा जिल्ह्यात एकूण 905 आयसोलेशन बेड आहेत. सध्या केवळ 73 रुग्णांवर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 481 ऑक्सिजन बेड आहेत. सध्या 49 ऑक्सिजन बेडवरच उपचार सुरू आहेत. तर 266 आयसीयू बेड आहेत. 50 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
काय सुरू आणि काय बंद?
सोमवारपासून भंडारा जिल्ह्यात नवीन नियमानुसार, सर्वच दुकाने सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंटमध्ये 50% क्षमतेनुसार जेवणाची व्यवस्था 4 वाजेपर्यंत करता येईल. त्यानंतर होम डिलिव्हरी करून जेवण देता येईल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, उद्याने हे सर्व सकाळी 5 ते 9 पर्यंत दररोज सुरू राहतील. जिम 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.