भंडारा -संपूर्ण देशात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना भंडारा जिल्ह्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ४८ वे ३ दिवसीय विदर्भ प्रांत अधिवेशनाला शुक्रवार (२० डिसेंबर) पासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी तरुणांना कोणतेही आंदोलनापूर्वी विषय समजून घेऊन नंतरच आंदोलन करावे. तसेच, आपला चुकीचा वापर होऊ देऊ नये, हे समजून घेणे गरजेचं असल्याचे मृणाल कुलकर्णी यावेळी म्हणाल्या.
तब्बल १७ वर्षांनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन २० ते २२ डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. स्प्रिंग शाळेत हे अधिवेशन होऊ घातले आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ४८ वे विदर्भ प्रांत अधिवेशनाला सुरुवात, मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन यावेळी उद्घाटनपर भाषणात मृणाल कुलकर्णी यांनी यावेळी आपले मत मांडले. 'अभावीप'ची शिस्त आणि विचारधारा बरेच काही शिकवून जाते. आपण ज्या घोषणा देतो त्याचा अर्थ समजून त्या अंगीकारण्याची गरज आहे. ध्येय गाठण्यासाठी उपासना आणि प्रयत्न करावे लागतात. ही क्षमता अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच आहे, असे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.
तरुणांमध्ये जोश असतो, उत्साह असतो आणि त्यामुळेच काही लोक या तरुणांची डोकी भडकविण्याचे काम करतात. त्यामुळे तरुणांनी प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती समजून घेतली तर निष्पक्षपणे आणि योग्य असे ते निर्णय घेतील आपला कोणी वापर करतोय का, हे देखील प्रत्येक तरुणाने समजून घेणे गरजेचे आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
हेही वाचा -"देश रडतोय, देश जळतोय, काहीतरी चुकतंय"
'अभाविप'चे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रफुलजी आकांत यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले केवळ मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आणि आंदोलन करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाही. ही छात्र शक्ती म्हणजे राष्ट्रशक्ती आहे. हे मागील अनेक वर्षापासून आम्ही सिद्ध केले आहे. हा देश माझा आहे आणि या देशासाठी जगणे हे माझे ध्येय आहे. हेच डोक्यात ठेवून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता अविरत कार्य करीत आहे. कलम ३७० रद्द होणे, राम मंदिराचा मुद्दा निकाली निघणे आणि नागरिकत्व सुधारणा विधेयक या तिन्ही गोष्टी अभाविपच्या कार्यकर्त्यांना मिळालेली ही भेट असून त्यापार्श्वभूमीवर होणारे हे अधिवेशन तेवढेच महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
ग्रामीण भारताला भारतासोबत जोडण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करत आहे. अनुभूती अभियानाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न देशभर सुरू आहे. तसेच स्त्रीशक्तीला स्वयंभू करण्यासाठी स्वरक्षणाचे प्रशिक्षण अभाविप देत आहे.
हेही वाचा -"भारताचे नागरिकत्व सिद्ध करण्यात 'प्रॉब्लेम' काय ?"
नागरिकता सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी समाजात जाऊन मुस्लिम बांधवांना भेटून वास्तविकता मांडण्याची गरज निर्माण झालेली असून अभाविपचा प्रत्येक कार्यकर्ता हे काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा -'जनभावनेचा आदर करून तरी सुधारित नागरिकत्व कायदा वेळीच मागे घ्या'