भंडारा -देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या आयुध निर्माणीच्या खासगीकरणाचा शासनाने घाट घातला आहे. याविरुद्ध बंड करत आयुध निर्माणीच्या कामगारांनी 20 ऑगस्टपासून देशव्यापी बंद पुकारला आहे. या देशव्यापी संपात जिल्ह्यातील जवाहर नगर आयुध निर्माणीचे कर्मचारीही सहभागी झाले आहेत. 99 टक्के कामे बंद असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त लावला आहे.
आयुध निर्माणीने कारगिल युद्धात तसेच 1965 आणि 1972 साली झालेल्या युध्दात शस्त्र आणि दारुगोळा पुरवला होता. तसेच युद्ध जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली होती. केंद्र सरकारने या आयुध निर्माणीचे खासगीकरण करण्याचे ठरविल्यानंतर येथे काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाला विरोध सुरू केला. मागील महिनाभरात विविध प्रकारचे आंदोलन करीत या निर्णयाचा सतत विरोध करीत राहिले. मात्र, याचा प्रभाव शासनाच्या निर्णयावर पडला नसल्याने आता या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उगारलेले आहे.
आंदोलन करताना आयुध निर्माणीचे कामगार देशातील 41 आयुध निर्माणीमधील 82000 कर्मचाऱ्यांनी या संपाची हाक दिली आहे. 20 ऑगस्टपासून हे काम बंद आंदोलन सुरू झाले असून 19 सप्टेंबरपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार आहे. भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर येथील आयुध निर्माणीचे १६०० कर्मचाऱ्यांनी या काम बंद आंदोलनात सहभाग घेतला आहे. केंद्र शासन निर्णयाविरुद्ध जोरदार नारेबाजी करीत खासगीकरणाचा त्यांनी विरोध दर्शविला.
देशात झालेल्या आजपर्यंतच्या सर्व युद्धामध्ये आम्ही निर्माण केलेले शस्त्र आणि दारुगोळा यांचा वापर केला गेला आणि याच्या मदतीने युद्ध जिंकले. आम्ही निर्माण केलेले शस्त्रसाठे कधीही फेल ठरले नाही. मात्र, मोदी शासन आल्यापासून प्रोपेलँड, धनुष्य गण, पिचोरा फेल होत आहेत. मोदी सरकारचे हे षडयंत्र असून उद्योगपतींचे घर भरण्यासाठी मोदी सरकारचे हे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, असा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
मंगळवारपासून सुरू झालेल्या या कामबंद आंदोलनामुळे उत्पादन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या आंदोलनाचा थेट फटका उत्पादनावर होणार आहे. तसेच जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा येथील कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे.