भंडारा - नगरपालिकेतील भाजपचे नगराध्यक्ष आणि खासदार सुनील मेंढे यांच्यावर त्यांच्याच पक्षातील लोकांनी भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला आहे. भाजपाचे नगरसेवक नितीन धकाते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती यांनी मिळून नगरपरिषदेसमोर आंदोलन केले.
मागील पंधरा दिवसांपासून भाजपचे बंडखोर नितीन धकाते यांनी त्यांच्या पक्षाला घरचा आहेर देत खासदाराविरुद्ध मोर्चा उघडला आहे. धकाते यांनी नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर पुरावे देण्याचा प्रयत्न केला. फेसबुकवर त्यांना बऱ्याच लोकांनी पाठिंबाही दिला. आपल्या पाठीशी भंडाऱ्याचे नागरिक आहेत, असा समज झाला. सोमवारी नगरपालिकेचा अर्थसंकल्प असल्याने सुनील मेंढे हे नगरपालिकेमध्ये उपस्थित होते. त्यामुळे धकाते यांनी सुनील मेंढे हटावसाठी आंदोलन केले.