भंडारा - जिल्ह्याच्या मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील बारा कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या पथकाने कारवाई केली. या बाराही कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. यामध्ये मोहाडी तालुक्यातील 10 आणि तुमसर तालुक्यातील 2 दुकांनाचा समावेश आहे. दुकानातील साठा, दरफलक अद्यावत नसणे, बिल न देता खताची विक्री करणे, बिलावर शेतकऱ्यांच्या सह्या न घेता युरिया विक्री करणे, युरिया सोबत इतर खतांची लिंकिंग करणे अशा 14 त्रुटी चौकशीदरम्यान पथकाला आढळल्याने कारवाई करण्यात आली.
कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करताना अधिकारी मोहाडी तालुक्यामध्ये कृषी केंद्रांवर खतांची जास्त दराने विक्री केली जात असल्याचे तसेच खतांची लिंकिंग करून विक्री केली जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार 24 जून ते 26 जून या कालावधीत जिल्हा व तालुकास्तरावरील भरारी पथकामार्फत परिसरातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. या पथकात जिल्हा कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, मोहाडी तालुका कृषी अधिकारी शिवाजी बोरसे, कृषी अधिकारी रवींद्र वंजारी, तुमसर तालुका कृषी अधिकारी विकास काळे, संजय न्यायमूर्ती, कृषी अधिकारी शांतीलाल गायधने, तंत्र अधिकारी यांचा समावेश होता.
या तपासणीमध्ये 14 त्रुटी आढळल्या आहेत -1) परवाना दर्शनी भागात न लावणे. 2) विक्री परवान्यात उगम प्रमाणपत्राची नोंद नसणे. 3) साठा दरफलक अद्यावत नसणे. 4) पीओएस मशीन व खत साठा रजिस्टर न जुळणे. 5) बिल बुक व कंपनीचे नाव/ लॉट नंबर न लिहिणे व नोंद न घेणे. 6) गटामार्फत विक्री न करणे. 7) साठा विक्रीचा मासिक अहवाल सादर न करणे. 8) युरिया सोबत इतर खतांची लिंक करणे. 9) बिलबुक विहित नमुन्यात नसणे. 10) पीओएस मशीन वर नोंदणी न घेता परस्पर शेतकऱ्यांना विक्री करणे. 11) रासायनिक खते, कीटकनाशके, बियाणे साठवणीची जागा व्यवस्थित नसणे. 12) बिले न देता युरिया खताची विक्री करणे. 13) बिलावर शेतकऱ्यांच्या सह्या न घेता युरिया विक्री करणे. 14) एकापेक्षा जास्त गोण्या फोडून खुल्या विक्रीसाठी ठेवणे.
निलंबनाची कारवाई करण्यात आलेली कृषी सेवा केंद्रे -1) प्रज्वल कृषी केंद्र, करडी, 2) कावळे कृषी केंद्र, करडी, 3) किसान विकास सहकारी खत केंद्र, करडी, 4) पितृछाया कृषी केंद्र, पालोरा, 5) एकता कृषी केंद्र, मूढरी, 6) आशीर्वाद कृषी केंद्र, मूढरी, 7) पियुष कृषी केंद्र, खराबी, 8) परमात्मा कृषी केंद्र, मुंढरी, 9) श्रीकांत कृषी केंद्र मूढरी खुर्द, 10) आचल कृषी केंद्र, मोहगाव सर्व मोहाडी तालुका, 11) राणा कृषी केंद्र मिटवानी, 12) साहिल कृषी केंद्र, गोबरवाही तालुका तुमसर या सर्व कृषी केंद्रांवर रासायनिक खते नियंत्रण, बियाण्यांचे नियंत्रण आदेश व अटी-शर्तीचे उल्लंघन, तसेच कीटकनाशके अधि नियमानुसार कारवाई केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईमुळे अनियमितता करून खते आणि बियाणे विक्री करणाऱ्या इतर कृषी सेवा केंद्राचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शासनाने निर्धारित केलेल्या खतांची आणि बियाणांची निर्धारित केलेल्या किमतीनुसार विक्री करण्याचे आदेश कृषी सेवा केंद्रांना देण्यात आलेले आहेत. तसेच शेतकऱ्यांनीही किमतीपेक्षा जास्त रक्कम न देता प्रत्येक खरेदी मागे पक्के बिल घेऊनच रक्कम अदा करावी. ज्या कृषी सेवा केंद्रांमध्ये अनियमितता असेल, त्याची तक्रार कृषी विभागाकडे करावी, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.