भंडारा - जिल्ह्यातील तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावर पोलीस ठाणे तुमसरअंतर्गत येत असलेल्या काटेबाम्हणी गावाजवळील रस्त्यालगत साचलेल्या पाण्याच्या डबक्यात गुरुवारी एका युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. आशीष सुरेश पावडे (२०) असे या मृत युवकाचे नाव आहे. तो नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील किट्स कॉलेजमध्ये सिव्हिलच्या तिसऱ्या वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.तो मुळचा राजुरा तालुक्यातील विरूर येथील रहिवासी होता.
पाण्याच्या डबक्यात आढळला युवकाचा मृतदेह, परिसरात खळबळ - आशीष सुरेश पावड़े
काटेबाम्हनी गावाजवळ पाण्याच्या डबक्यात एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली. युवकाचे प्रेत मिळण्याआधी अर्धा तास पाऊस पडत होता, त्याआधी या रस्त्यावर काहीच नव्हते. त्यामुळे आशिषला दुसरीकडे मारून त्याचा मृतदेह येथे पाण्यात आणून तर फेकला नाही ना, असा संशय निर्माण झाला आहे.
गुरुवारी सायंकाळी सांय ५ च्या सुमारास तुमसर परिसरात पाऊस आल्यानंतर रस्त्याच्या शेजारी पाण्याचे डबके साचले होते. अशाच एका डबक्यात रामटेक मार्गावरील काटेबाम्हनी गावाजवळ पाण्यात एक युवक पडून असल्याचे गावकऱ्यांना दिसले. नागरिकांनी याची माहिती तुमसर पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी पोहचले, त्यावेळी या युवकाचा मृतदेह पाण्यात पालता पडला होता. पोलिसांनी त्याला बाहेर काढले. मृत युवकाची तपासणी केली असता त्याच्याजवळ मिळालेल्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली.
आशिषचा मृतदेह आढळला त्या ठिकाणी एकही दुचाकी किंवा इतर साधन नव्हते. त्यामुळे तो रामटेकवरून 45 किलोमीटर दूर कसा आला, हे कोडेच आहे. आशिषचा मृतदेह आढळण्यापूर्वी अर्धा तास पाऊस पडत होता. तेव्हाच हा मृतदेह रस्त्याच्या बाजूला पडलेला असल्याचे दिसले. त्याआधी या रस्त्यावर काहीच नव्हते. त्यामुळे आशिषला दुसरीकडे मारून त्याचे मृतदेह येथे पाण्यात आणून तर फेकला नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पोलिसांनी आशिषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. ही हत्या, आत्महत्या आहे की दुर्घटना याचा तपास तुमसर पोलीस करीत आहेत. ही घटना गावातील नागरिकांना माहीत होताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.