भंडारा - शहरात भरदिवसा वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील प्रसिद्ध डॉक्टर टेंभुर्णे यांच्या आई-वडिलांना दोन अज्ञात तरुणांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयीची तक्रार भंडारा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. तपास सुरू असून लवकरच आरोपी पकडले जातील, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
नंबरप्लेट नसलेली दुचाकी वापरली
भंडारा शहरातील लाला लजपतराय वॉर्डामध्ये राहत असलेल्या अभिमन मगरू टेभुर्णे व त्यांची पत्नी हे वृद्ध दाम्पत्य घरी एकटे असल्याचे पाहुन दोन अनोळखी व्यक्ती हे निळ्या रंगाच्या ॲक्टिव्हावर आले. या दुचाकीला नंबर प्लेट लावलेली नव्हती.
मोठ्या मुलांविषयी केली विचारपूर
हे दोन्ही अनोळखी तरुण घरी आल्यावर मुद्दाम मुलांविषयी विचारायला लागले. या मोठ्या मुलाची पत्नी मागील कित्येक वर्षांपासून माहेरी गेली आहे. याचीही माहिती या हल्लेखोरांना होती. ही माहिती विचारत त्यांनी घरात प्रवेश मिळविला, त्यानंतर चहा आणि पाणी घेत त्यांच्या मोठ्या मुलाची प्रतीक्षा करीत एक तास थांबले. चहा घेऊन झाल्यानंतर तक्रारदाराची पत्नी ही घरात कपबशी ठेवण्यास गेली तेव्हा तिला पतीचा अचानक आवाज बंद झाला असल्याचे लक्षात आले, हे पाहण्याकरिता बाहेर आली असता दोन्ही व्यक्ती तक्रारदार मगरू टेंभुर्णे यांच्या छातीवर बसून, त्यांच्या तोंडात कापडाचा गोळा भरून गळा दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. हे बघताच त्यांनी आरडा-ओरड केला. हल्लेखोरांनी मिरर्ची स्पे डोळ्यात टाकत पळ काढला. या वृद्ध महिलेचा आवाज ऐकून शेजारी धावत आले, मात्र तोपर्यंत हे हल्लेखोर त्यांच्या निळ्या रंगाची विना नंबरप्लेट ॲक्टिव्हा गाडीने पसार झाले होते.
'गुन्हेगार लवकरच पकडले जातील'
या हल्ल्यात मगरू टेंभुर्णे यांच्या छातीचे दोन हाडे तुटली आहेत. या घटनेची भंडारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली गेली असून अज्ञात व्यक्तींवर ३२५, ३२३, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.